इराकमध्ये अग्नीतांडव ! रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट, 82 जणांचा मृत्यू तर 110 जखमी

ADV

बगदाद : पोलीसनामा ऑनलाइन –   कोविड रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत 82 जणांचा मृत्यू झाला. तर 110 जण जखमी झाले आहेत. इराकची राजधानी बगदादमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्न अल-खातिब हॉस्पिटलमध्ये लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यात अनेक रुग्णांना बाहेर काढण्यात आले. पण, हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यांना या आगीतून वाचवता आले नाही. दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांनी बगदाद आरोग्य विभागात नियुक्त असलेले महानिर्देशक आणि हॉस्पिटल निर्देशक यांना पदावरुन काढून टाकले आहे.

इराकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात 82 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये ठिकठिकाणी जळलेले मृतदेह पडले होते. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आगीच्या घटनेनंतर पंतप्रधानांनी बगदादमध्ये आपात्कलीन बैठक घेतली. पंतप्रधान कादिमी म्हणाले की, निष्काळजीपणामुळे हा अग्नितांडव झाला आहे. निष्काळजीपणा ही चूक असू शकत नाही, तर तो अपराध आहे आणि त्यासाठी सर्वजण जबाबदार आहेत. कादिमी यांनी अधिकाऱ्यांना 24 तासांच्या आत रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. इराकमधील संयुक्त राष्ट्रचे राजदूत जेनिन हेनिस प्लेसकार्ट यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.