खुशखबर… पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार, कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत होते. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना चांगलाच तडाखा बसत होता. मात्र, आता काहीसे दिलासादायक चित्र असून काही दिवसांपासून इंधनाचे दर थोडे-थोडे कमी होत आहेत. आता अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण सुरु झाली असून पेट्रोल व डिझेल अजून स्वस्त होऊ शकते, अशी चिन्हे आहेत.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात प्रति तेल पिंपाचा दर ६९ डॉलरपेक्षा कमी झाली असून यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आणखी कपात अपेक्षित आहे. यामुळे महागाई देखील कमी होण्याच्या मार्गावर आहे. भारतात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९१ रुपयांपर्यंत गेले होते. या दरवाढीमुळे देशात नागरिकांचा संताप वाढत चालल्याने सुरूवातीस दुर्लक्ष करणाऱ्या आणि दरवाढीचे समर्थन करणाऱ्या केंद्र सरकारला अखेर कर कपात करुन नागरिकांना दिलासा द्यावा लागला होता.

बेकायदेशीर गर्भपातप्रकरणी कोल्हापुरातील १५ हॉस्पिटलवर छापे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओपेकला तेल पुरवठयामध्ये कपात करु नका असे आवाहन केले आहे. ओपेक ही जगातील तेल पुरवठादार देशांची संघटना आहे. ओपेकमधील प्रमुख तेल निर्यातदार सौदी अरेबियाने डिसेंबर महिन्यात तेल पुरवठयामध्ये कपात करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना हे आवाहन करावे लागले. सौदी अरेबियाने मनमानी केली तर त्यांचे अमेरिकेबरोबर संबंध आणखी बिघडू शकतात. अमेरिकेने इराणवर निर्बंध लावले आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमतींमुळे अमेरिकेला भारतासह अन्य सात देशांना इराणकडून तेल खरेदीची नाईलाजाने परवानगी द्यावी लागली आहे.

यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाचे दर वेगाने घसरत आहेत. आता कच्चा तेलाचा दर प्रति तेल पिंप ६९ डॉलरपेक्षा कमी झाली असून यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल, डिझेलचे दर आणखी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पेट्रोल डिझेलमुळे वाढलेली महागाईदेखील केंद्र सरकारने लक्ष दिल्यास कमी होऊ शकते, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.