AB आणि B ब्लड ग्रुप असणार्‍यांना कोरोनाचा अधिक धोका; CSIR रिपोर्टमध्ये दावा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पण अद्यापही यावर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यातच आता ‘काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ने (CSIR) एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे.

‘काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च’ने (CSIR) प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले, की AB आणि B रक्तगट असणाऱ्या लोकांना इतर रक्तगट असणाऱ्या लोकांच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. तर O रक्तगट असणाऱ्या लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वात कमी धोका आहे. तसेच जर अशा लोकांना कोरोना जरी झाला तरी त्यांच्यामध्ये लक्षणे मोठी नसतात. मांसाहार करणाऱ्या लोकांना शाकाहारी लोकांच्या तुलनेने कोरोनाचा जास्त धोका आहे. CSIR चा हा सर्वे देशातील 10 हजारांपेक्षा जास्त लोकांवर केला होता.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अशोक शर्मा यांनी सांगितले, की काही लोकांच्या जेनेटिक स्ट्रक्चरवर अवलंबून असतो. O रक्तगट असणाऱ्या लोकांची इम्युन सिस्टिम AB आणि B रक्तगट असणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त प्रमाणात असू शकते. असे असले तरी O रक्तगट असणाऱ्या लोकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावेच. त्यांची इम्युन सिस्टिम पूर्णपणे सुरक्षित नाही.