कराड : अभिनंदन झेंडे टोळीतील चौघे तडीपार

कराड : पोलीसनामा ऑनलाइन –  शहरातील गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल असलेल्या अभिनंदन झेंडे याच्यासोबत चार जणांच्या टोळीला दोन वर्षासाठी तडीपार करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले. अभिनंदन रतन झेंडे (२९, रा. शनिवार पेठ) प्रतीक उर्फ बबलू परशुराम चव्हाण (२५, रा. शनिवार पेठ) परशुराम रमेश करवले (२०, रा. सोमवार पेठ) व अविनाश प्रताप काटे (२३, रा. बुधवार पेठ) अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, कराड शहर परिसरात खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणे, जबरी चोरी करणे, सरकारी कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना जखमी करणे अशी गंभीर स्वरूपाचे गुन्हे या चौघांच्या टोळीवर दाखल होते. त्याच पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी संशयित चौघांना तडीपार करण्यासंदर्भातील प्रस्ताव पोलीस अधीक्षक अजितकुमार बन्सल यांच्याकडे पाठवला होता. सदर प्रस्तावावर पोलीस अधीक्षकांनी मंजुरी देताच अभिनंदन झेंडे व त्याच्या टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्यातून दोन वर्षांचा कालावधीकरता तडीपार करत असल्याचे आदेश दिले.

यापुढेही कारवाई सुरु राहणार !

चौघा गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, सर्वसामान्यांना त्यांचा उपद्रव होत होता. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्याच अनुषंगाने चार संशयितांना तडीपार करण्यात आले. दरम्यान, समाजात दहशत माजविणाऱ्या गुंडांविरुद्ध यापुढेही अशा स्वरुपाची कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.