संतापजनक ! अभिनेता राहुल वोहराचा मृत्यूपुर्वीचा व्हिडीओ व्हायरल, ऑक्सिजनच्या जागी रिकामं मास्क लावून निघून गेले डॉक्टर्स (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आवश्यक त्या आरोग्य सेवा-सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णही दगावत आहेत. त्यातच आता अभिनेता राहुल वोहरा यांचे कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन झाले. पण मृत्यूपूर्वीचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

राहुल वोहरा यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने अखेर उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी ज्योती तिवारी यांनी रुग्णालयाविरोधात बेजबाबदार काम केल्याचा आरोप करत आता न्याय देण्याची मागणी केली आहे. त्यांनी राहुल यांचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये राहुल यांनी म्हटले, की त्यांनी मास्क काढत बोलले की याची मोठी किंमत आहे आजच्या काळात. याविना रुग्ण तडफडतो. त्यानंतर ते मास्क पुन्हा लावतात आणि काढतात आणि म्हणतात, यातून काहीही येत नाही.

तसेच ज्योती यांनी पोस्टमध्ये लिहिले, की ‘प्रत्येक राहुलसाठी न्याय. माझा राहुल तर गेला. हे सर्वांना माहिती आहे की तो गेला पण कसा गेला हे माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालय दिल्ली. तिथं अशाप्रकारे उपचार केला जातो. आशा करते, माझ्या पतीला न्याय मिळेल. एक आणखी राहुल या जगातून नको जायला…’