सत्तरीतही आजीबाईंची जिद्द कायम ! 2 लाख 20 हजार वेळा लिहला मंत्र, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : पोलीसनामा ऑनलाईन –     वय सत्तरी पार केलेले पण धार्मिक कार्याची आवड, अध्यात्माची ओढ आणि वय झाल तरीही जीवनात काहीतरी करून जाण्याची जिद्द याच्या बळावर बुलढाणा जिल्ह्यातील एका आजीने ’ओम नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र 2 लाख 20 हजार वेळा लिहिला आहे. त्यांच्या मंत्र लिखाणाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेऊन त्यांचा गौरव केला आहे.

श्रीमती कमलाबाई भुतडा (वय 70) असे या आजीबाईचे नाव आहे. मूळ चिखलीच्या रहिवासी श्रीमती कमलाबाई भुतडा या देऊळगाव राजा येथे राजेश भुतडा या मुलासोबत राहतात. श्री बालाजी महाराजांच्या निस्सीम भक्त असलेल्या कमलाबाईची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये नोंद झाली आहे. त्यांनी ’ओम नमो भगवते वासुदेवाय’ हा मंत्र 21 जानेवारी 2014 पासून लिहायला सुरुवात केली. यासाठी तब्बल 18 रजिस्टर लागले. सध्या त्यांचे वय 70 वर्ष असून 20 जानेवारी 2020 रोजी 2 लाख 20 हजार वेळा मंत्र लिहून पुर्ण केली आहेत. तसेच त्यांनी विठ्ठल नामाचा लेखणी जपही 2 लाख 20 हजार वेळा लिहिले आहे. गत सहा वर्षापासून त्या सातत्याने दररोज किमान चार ते पाच तास मंत्राचे लिखाण करतात.

त्यांच्या या अविरत कार्याचा सुरू असलेला वसा बघून त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उदात्त हेतूने त्यांचे कार्य इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेकडे पाठविण्यात आले. त्यांच्या या कार्याची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2021 मध्ये त्यांची नोंद करून त्यांचा गौरव केला आहे. त्यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेतर्फे सन्मानपत्र मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातून प्रथमच एका 70 वर्षीय महिलेने अध्यात्माच्या मार्गाने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविल्या बद्दल श्रीमती कमलाबाई भुतडा, त्यांचा मुलगा राजेश भुतडा व सून वनिता भुतडा यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.