सत्ताधारी ग्रामपंचायत निवडणुकीत आमने-सामने

पुणे : पोलीसनाममा ऑनलाइन – मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामपंचातय (Gram Panchayat) निवडणुकांचे (Election) बिगुल वाजले आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने (Allies) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यातील सर्वच ग्रामपंचातीच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केला आहे. पुणे जिल्ह्यातील निम्यापेक्षा अधिक म्हणजे तब्बल 748 ग्रामपंचायतीचा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. मात्र, राज्यात एकत्र असलेले मित्रपक्ष जिल्ह्यातील ग्रामपंचात निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. लॉकडाऊनमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2020 अखेर मुदत संपलेल्या सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. मात्र, या ग्रमपंचायत निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

राज्याच्या सरकारमध्ये मित्रपक्ष असलेले राजकीय पक्ष स्थानिक पातळीवर कट्टर विरोधक आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर आमदार, खासदार, अन्य पदाधिकारी यांची चांगलीच अडचण झाली आहे. पुणे जिल्ह्यात 1407 ग्रामपंचायती असून यामध्ये बहुतेक ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर काही तालुक्यात शिवसेना, काँग्रेस आमि भाजपची देखील चांगली ताकद आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काही तालुक्यात शिवसेना आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना आमने-सामने आहे.

तसेच भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रस हे दोन पक्ष कट्टर विरोधक आहेत. तर शिरुर आणि मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत होत आहे. बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात राष्ट्रावादीला भाजपचे आव्हान आहे. यामुळे मागील वर्षभर राज्यात एकत्र असलेले मित्र पक्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमने-सामने उभे राणार असल्याने हा रणसंग्राम चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायती

भोर – 73, खेड -91, शिरुर – 71, जुन्नर – 66, पुरंदर – 60, मावळ – 57, हवेली – 54, बारामती – 52, दौंड – 51, मुळशी – 45, वेल्हा -31, आंबेगाव -29, पिंपरी-चिंचवड – 1, एकूण – 748