अभिमानास्पद ! अमरावतीच्या तरुणाची थेट स्कॉटिश संसदेत ‘एन्ट्री’, घेतली खासदारकीची शपथ (व्हिडीओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अनेक भारतीय वंशाच्या नेत्यांनी अमेरिकेच्या संसदेत पाऊल ठेवलं आहे. अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांची ज्यो बायडेन यांच्या प्रशासनात देखील वर्णी लागली आहे. ही घटना ताजी असतानाच भारतीयांच्या अभिमानात भर घालणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. यावेळी अमरावतीच्या एका मुलाने थेट स्कॉटलंडमधील खासदारकीची निवडणूक जिंकून दाखवली आहे. त्यांनी नुकतीच खासदारकीची शपथ घेत स्कॉटिश संसदेत प्रवेश केला आहे.

मुळचे अमरावती शहरातील रहिवासी आणि सध्या स्कॉटलँड येथे वैद्यकीय सेवा देत असलेले डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे यांनी स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. स्कॉटिश संसदेत जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. डॉ. संदेश गुल्हाणे यांच्या यशाने राज्यासह अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील रहिवासी प्रकाश गुल्हाणे यांना सहा बहिणी आहेत. त्यांची एक बहिण इंजिनिअरिंग झाल्यावर प्रकाश यांना अमरावतीवरुन लंडनला घेऊन गेली. 1975 साली लंडन येथे गेल्यानंतर डॉ. संदेश यांच्या वडिलांना एक खासगी नोकरी मिळाली. चांगली नोकरी मिळाल्याने प्रकाश गुल्हाणे यांनी लंडनमध्येच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लग्न केलं त्यांचा एकुलता एक मुलगा डॉ. संदेश यांचाही जन्म लंडनमध्येच झाला. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या संदेश गुल्हाणे यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून काम केले आहे.

वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध क्षेत्रात कार्य करत स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. 2021 मध्ये डॉ. संदेश यांना स्कॉटलंडच्या संसद निवडणुकीत ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. स्कॉटिश इन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून डॉ. संदेश खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी नुकतीच स्कॉटिश संसदेत खासदार म्हणून शपथ घेतली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या संदेश यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ते कौतुकास पात्र ठरत आहेत.