अलर्ट ! अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन वापरकर्त्यांचा डेटा होऊ शकतो हॅक, या चिपमध्ये आढळून आले तब्बल 400 दोष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अ‍ॅण्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन चिपमुळे जगभरातील 300 कोटी मोबाईल युजर्सचा डेटा धोक्यात आला आहे. चेकपॉईंटने डीएसपी चिपचे परीक्षण केले असता यामध्ये 400 पेक्षा अधिक दोष आढळून आले आहेत. त्यामुळे जगभरातील 300 कोटी मोबाईल युजर्सचा डेटा हॅक होण्याची मोठी शक्यता आहे. स्मार्टफोन बाजारातील 40 टक्के मोबाईलमध्ये या चिपचा वापर केला जातो.

गुगल, एलजी, सॅमसंग, शाओमी इत्यादी मोबाईल कंपन्यांच्या महागड्या आणि स्वस्तातल्या मोबाईलमध्ये ही चिप बसवली जाते. चेकपॉईंटने या डीएसपी चिपचे परिक्षण केले असता यामध्ये 400 दोष सापडले आहेत. याच्या माध्यमातून युजर्सच्या नकळत हॅकर्स त्यांच्या मोबाइलचा डेटा हॅक करु शकतात.एवढेच नाही तर हॅकर्स मोबाईलमधील फोटो, व्हिडीओ, कॉल रेकॉर्डिंग, मायक्रोफोन, जीपीएस डेटा वापरु शकतात, विशेष म्हणजे याची माहिती युजर्सला कळणार देखील नाही.

आणखी एक धोकादायक बाब म्हणजे, हॅकर्स युजर्सच्या मोबाईलमध्ये मालवेअर किंवा इतर धोकादायक कोड इंजेक्ट करून युजर्सचा मोबाइलचा वापर करु शकता. या संभाव्य धोक्याची माहिती चेकपॉईंटने संबंधित देशांच्या सरकारला आणि स्मार्टफोनच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. सध्या यावर वेगाने काम सुरु आहे.

अ‍ॅपल युजर्सना धोका नाही
बाजारातील ठरावीक स्मार्टफोनला याचा धोका असला तरी सध्यातरी हा धोका अ‍ॅपलच्या युजर्सना नाही. कारण या मोबाईल फोनमध्ये अ‍ॅपलच्या चिप बसवल्या जातात. केवळ अ‍ॅण्ड्रॉईड स्मार्टफोनला याचा धोका अधिक असल्याचे चेकपॉईंटने म्हटले आहे.