अपोलो रुग्णालय अन् डॉ. रेड्डीज लॅब यांच्यात Sputnik V च्या लसीकरणासाठी करार; जाणून घ्या कोठं मिळणार लस

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात 1 मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून आता 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. सध्या देशात सीरमची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. त्यातच आता रशियाची Sputnik V ही लसदेखील दिली जाणार आहे. दरम्यान ओपोलो रुग्णालय आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटोरिजने स्पुटनिक व्ही च्या लसीकरणासाठी करार करत असल्याची माहिती दिली. या लसीकरण कार्यक्रमाचा पहिला टप्पा सोमवारी हैदराबादमध्ये सुरु झाला आहे.

लसीकरणादरम्यान सरकारकडून केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल आणि याचे रजिस्ट्रेशन CoWIN मध्येही असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पायलट टप्प्यात डॉ. रेड्डीज आणि अपोलो व्यवस्थापन, तसेच कोल्ड चेन लॉजिस्टिकचे परिक्षण आणि लाँच करण्याची तयारी करतील, अशी माहिती अपोलोच्या रुग्णालय विभागाचे अध्यक्ष के. हरी प्रसाद यांनी सांगितले. तसेच स्पुटनिकद्वारे कोरोना लसीची उपलब्धता अन् पोहोच सहजरित्या उपलब्ध करून देऊ शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खासगी क्षेत्रांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्याची परवानगी आणि लस खरेदीसाठी मान्यता दिली आहे. सध्या देशात 60 ठिकाणी कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. यात अपोलो हॉस्पीटल, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटल आणि अपोलो क्लिनिक यांचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. आमचे दोन पायलट प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी काम करत होते. याचा उद्देश शक्य तितक्या मोठ्या प्रमाणात भारतीयांचे लसीकरण करणे हे होते, अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीचे सीईओ ब्रांडेड मार्केट्स एम.व्ही.रामणा यांनी दिली आहे.