अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर आज (दि. १४) मे ला ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ म्हणजेच एम्स येथे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होणार आहे. जेटली यांचे वय (६५) असून ते उपचारासाठी शनिवारी (दि. १२) रुग्णालयात दाखल झाले होते. ते एक महिन्यापासून डायलिसीस उपचार घेत आहेत.

जेटलींवर यापूर्वी एप्रिल महिन्यात मूत्रपिंडावरील शस्त्रक्रिया होणार होती. पण ऐनवेळी मूत्रपिंड दात्याशी न जुळल्यामुळे ती शस्त्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यावेळी सुमारे तीन दिवस शस्त्रक्रियेसाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, मधुमेहामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळेच हा विकार उद्भवल्याचा तर्क आहे. ही शस्त्रक्रिया मोदी सरकार सत्तेत येताच २०१४मध्ये झाली होती. मात्र त्यात गुंतागुंत उद्भवल्याने त्यांना तातडीने आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते.