पर्यटकांसाठी खुशखबर ! सांस्कृतिक मंत्रालयाने प्राचीन वास्तूवरील कोरोनाचे निर्बंध हटवले

नवी दिल्ली : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. प्राचीन वास्तू आणि केंद्रीय संरक्षित स्मारकांना भेटी देणार्‍या पर्यटकांवरील संख्येची मर्यादा काढून टाकली आहे. त्याचबरोबर आगाऊ आरक्षण, क्युआर कोडचे बंधनही शिथील करण्यात येणार आहे. लवकरच प्रत्यक्ष तिकीट विक्री सुरु करण्यात येणार आहे. तसेच ध्वनी आणि लाईट शो पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली जाणार आहे.

 

 

 

 

 

 

 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक प्राचीन वास्तू, संग्रहालये, पर्यटकांचे आकर्षण राहिलेली स्थळे बंद होती. गेल्या महिन्यात या वास्तुंना भेट देण्यास पर्यटकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, तेथे संख्येची मर्यादा घालण्यात आली होती. तसेच प्रत्यक्ष तिकीट विक्री ऐवजी ऑनलाईन आरक्षण केल्यानंतरच क्युआर कोड असेल तर परवानगी दिली होती. मात्र, अनेक प्राचीन वास्तू स्थळांजवळ नेटवर्कचा प्रॉब्लेम भेडसावत होता. त्यामुळे आता प्राचीन वास्तूच्या ठिकाणी जाऊन पर्यटकांना प्रत्यक्ष तिकीट काढता येणार आहे.

देशभरातील प्राचीन पर्यटनस्थळे बंद असल्याने किंवा अतिशय मर्यादित स्वरुपात खुली असल्याने तेथील पारंपारीक व्यावसायिक, गाईड त्यांची रोजीरोटी बंद झाली होती. त्याचबरोबर वाहतूक व्यावसायिक यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. आता हे व्यवसाय नव्या जोमाने पुन्हा सुरु होऊ शकतील.