फक्त दोनच दिवसांमध्ये बाबा रामदेव यांची झाली ‘चांदी’, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार तब्बल ८७० अंकांनी कोसळला. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चांगलाच चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी योगगुरू बाबा रामदेव यांच्या एका कंपनीला भरघोस नफा झाल्याची माहिती मिळाली आहे. न्यूट्रिला ब्रॅण्डचे उत्पादन करणाऱ्या रुचि सोया या कंपनीचे शेअर्स वधारले.

०१ एप्रिल २०२१ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. यानंतर पुढील दोनच दिवसात रुचि सोया कंपनीचे शेअर्स तब्बल १० टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद होता. याशिवाय शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी होती. मात्र, तरीही नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवसांत झालेल्या शेअर्स वाढीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. रुचि सोयाचे शेअर्स १० टक्क्यांनी वाढले.

गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचे मार्केट कॅपिटल १८ हजार ९७३ कोटी रुपयांवर होते. तर, कंपनीच्या शेअर्सची किंमत ६४१.३५ रुपये होती. मात्र, नवीन वर्षात यात १० टक्के वाढ नोंदवली गेली. दरम्यान, कोरोनाबाधितांची दररोज वाढणारी संख्या आणि देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाउनचे पडसाद भांडवली बाजारावर उमटले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी रुचि सोया या कंपनीचे शेअर्स ३३.६५ अंकांनी वाढून बाजार बंद झाला, तेव्हा ७०७.०५ अंकांवर स्थिरावले. तसेच यामुळे रुचि सोया कंपनीचे कॅपिटल मार्केट २० हजार ९१७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

दैनंदिन रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. तसेच राजस्थान, कर्नाटक या राज्यामध्ये करोना झपाट्याने फैलावत आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउनचे संकट गडद बनले असून औद्योगिक क्षेत्र धास्तावले आहे. सोमवारी बाजारात झालेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्समध्ये तब्बल ८७० अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०० अंकांनी घसरला. या पडझडीने गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटीचे नुकसान झाले आहे. सध्या सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरु आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखांवर गेला आहे.