दिलासादायक ! कोरोनावरील उपचारासाठी बजाज हेल्थकेअरची Favijaj टॅबलेट बाजारात येणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. तसेच कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय औषध निर्माता कंपनी बजाज हेल्थकेअरने आपले अँटीपारॅसॅटिक औषध फविजाज टॅबलेट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी हे औषध वापरता येणार आहे.

बजाज हेल्थ केअर कंपनीने म्हटले आहे की, या औषधाच्या निर्मिती व विक्रीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून मान्यता मिळाली आहे. इव्हेरमॅक्टिनसाठी औषधी घटक आणि त्याचे फॉर्म्युलेशन स्वत:च्या संशोधन आणि विकास कार्यसंघाद्वारे यशस्वीरित्या विकसित करण्यात आले आहे. डीसीजीआयने या टॅबलेटला देशांतर्गत आणि परदेशी बाजारात पाठविण्याची परवानगी दिल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान देशात रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने 2 कोटीचा टप्पा पार केला आहे. बंगळूरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका टीमने गणितीय मॉडेलच्या मदतीने भविष्यवाणी केली आहे की, देशात रुग्णांचा संख्या जर अशीच वाढत राहीली तर 11 जूनपर्यंत जवळपास 4 लाख 4 हजार मृत्यूची नोंद होईल, असे रिसर्चमध्ये म्हटले आहे.