बजरंग दल आणि विहिंप धार्मिक दहशतवादी संघटना,अमेरिकन सीआयएचा अहवाल

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

‘द वर्ल्ड फॅक्टबुक’ हे अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचा वार्षिक अहवाल सादर करते . सीआयए दरवर्षी विविध देशांचा इतिहास, भूगोल, सरकार, अर्थव्यवस्था, ऊर्जा, दूरसंचार, परिवहन, लष्कर, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि राजकीय पक्षांबाबतच्या माहितीचा समावेश असलेली यादी जाहीर करते. यावर्षी देखील सीआयएने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल या संघटनांना ‘धार्मिक दहशतवादी संघटना (militant religious organization) म्हणून घोषित करण्यात आले आहे.तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राष्ट्रवादी संघटना (nationalist organization) असे म्हटले आहे.

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने जगभरातील त्या-त्या देशातील राजकीय दबाव गट आणि त्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. या अहवालात जगातील 267 देशांची माहिती देण्यात आलेली आहे.

दरम्यान , सीआयए ने बजरंग दल आणि विहिंप ला कट्टरवादी किंवा दहशतवादी संबोधल्यामुळे आता या दोन्ही संघटना कायदेशीर मार्ग अवलंबणार आहेत. आमच्यावरील दहशतवादीचा शिक्का हटवा नाहीतर कायदेशीर कारवाई करू ,असा इशारा या संघटनांनी सीआयए ला दिला आहे.

भारताच्या यादीत ७ संघटनांचा समावेश

सीआय ए ने जारी केलेल्या यादीत सात संघटनांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच त्यांना विविध श्रेणी देण्यात आली आहे. या यादीत जम्मू काश्मीरमधील ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला फुटीरतावादी गटात, तर जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेचा बजरंग दल आणि विहिंपप्रमाणे कट्टरतावादी संघटनेच्या गटात समाविष्ट केले आहे.