बसपा नेते भीम राजभर यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले- ‘गंगा जलपेक्षा शुद्ध आहे ताडी, पिल्याने नाही होणार कोरोना’

पोलीसनामा ऑनलाईन : बहुजन समाज पक्षाचे (बसपा) प्रदेशाध्यक्ष भीमा राजभर यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. बलियामध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, तुम्हाला कोरोना व्हायरस टाळायचा असेल तर ताडी प्या. तसेच त्यांनी ताडीची तुलना गंगा नदीशी केली. राजभर म्हणाले की, ताडी गंगा नदीच्या पाण्यापेक्षा शुद्ध आहे. ते म्हणाले की, राजभर समाज ताडीच्या व्यवसायातूनच आपल्या मुलांची काळजी घेतो. त्यांचा म्हणण्यानुसार, ताडीचे झाड हे पृथ्वीवरील सर्वात जुने झाड आहे. या प्रकरणात, ते पिण्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे शरीराला रोगांविरूद्ध लढण्याची शक्ती मिळते. यामुळे, तेेेे पिल्याने कोरोना होणार नाही.

राजभर असेही म्हणाले की, ‘ताडीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि त्यातील प्रत्येक थेंब गंगा नदीच्या पाण्यापेक्षा शुद्ध आहे’. दरम्यान, बसपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आमदार उमाशंकर सिंह यांनी बलिया येथे भीमा राजभर यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान भीमा राजभर म्हणाले, कोरोना टाळण्यासाठी ताडी प्या. मी म्हणतो की ताडी पिण्यामुळे कोरोना होणार नाही. ताडी पिऊन राजभर समाज प्रतिकूल परिस्थितीतही जिवंत राहतो.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी भीम राजभर यांच्या वादग्रस्त विधानाला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, काही लोक फालतू बोलून राजभर समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

एकूण रुग्णांची संख्या 5,76,832 वर

इतर राज्यांप्रमाणे उत्तर प्रदेशातही कोरोना विषाणूची प्रकरणे कमी होण्याचे नाव घेत नाही. कोविड – 19 मुळे उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, संक्रमणाने मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या 8,224 वर पोहोचली आहे. संसर्गाच्या 1,277 नवीन घटनांसह एकूण रुग्णांची संख्या 5,76,832 वर पोहोचली आहे.