ATS ची मोठी कारवाई ! 1300 जिलेटिनच्या कांड्या, 835 डिटोनेटर्स जप्त

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन –  ग्रामीण पोलिसांच्या दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तिवसा तालुक्यातील घोटा येथील एका शेतातील गोदामावर छापा टाकून तब्बल 1300 जिलेटीनच्या कांड्या 835 डिटोनेटर्स अशी स्फोटके जप्त केली आहेत. पोलिसांनी अवैधरित्या स्फोटके बाळगणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मुंबईमध्ये स्फोटके आढळून आल्यानंतर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी दहशतवाद विरोधी कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैधरित्या स्फोटके बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांना तिवसा तालुक्यातील घोटा येथील एका शेतातील गोदामात स्फोटकांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शेतातील गोदामावर सोमवारी (दि.17) छापा टाकला.

पोलिसांनी युवराज उद्धव नाखले (वय-42 रा. घोटा) याला ताब्यात घेतले आहे. गोदामातून 1300 नग जिलेटिनच्या कांड्या, 835 डिटोनेटर्स आणि ब्लास्टिंग यंत्र बसवलेला ट्रॅक्टर असा एकूण 4 लाख 35 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही स्फोटके या गोदामामध्ये अवैधरित्या साठवून ठेवण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे स्फोटकांचा कुठल्याही प्रकारचा परवाना नाही. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने ही स्फोटके ईश्वर मोहोड (रा. मार्डी) याने पुरवल्याची माहिती दिली आहे. आरोपीला कुऱ्हा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय गराड, सुनील केवतकर, संतोष तेलंग, बळवंत दाभणे, श्यामकु मार गावंडे, चंद्रशेखर खंडारे, मंगेश लडके यांच्या पथकाने केली.