‘तुम्ही फक्त Lockdown घोषित करण्यापुरते मुख्यमंत्री झालेले आहात का?, हा प्रश्न महाराष्ट्राला पडेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात मराठा आरक्षण आणि पदोन्नतीमधील आरक्षणावरुन विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचे आयते कोलीत मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच सामाजिक आघाड्यावंर राज्यात गोंधळ सुरु आहे. मराठा आरक्षण असो किंवा पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण असो किंवा जे आदिवासींना ते धनगरांना देणे असो, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

गोपीचंद पडळकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, बुधवारी दिवसभर राज्य शासकीय सेवेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर जो काही सावळागोंधळ झाला त्यावरुन सरकारचे पुरते वाभाडे निघालेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या बातमीवरून चॅनेल्सवर बातम्या झळकल्या. राऊत यांनी सरकारला झुकवले व पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा 7 मे रोजीचा जीआर स्थगित करण्यात आला. त्यापाठोपाठ तासभरात माहिती आली की, पदोन्नतीतील आरक्षणाबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसा कोणताही निर्णय बैठकीत झालेला नसतानांही जीआर स्थगित केल्याच्या बातम्या पसरवल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर दोनच तासात राऊत यांच्या कार्यालयाने जीआर रद्द करण्याची मागणी केली. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपत नाही तोच उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे पत्रकारांना माहिती देतात पण अजित पवार यांनी बैठकीनंतर कोणतीही माहिती पत्रकारांना दिली नाही. आता दिलीप वळसे-पाटील म्हणतात पदोन्नतीचा विषय मार्गी लावला. त्यामुळे बैठकीत नेमके काय ठरले हे कळायला मार्ग नाही.

प्रस्थापितांचा बहुजन आरक्षणाबाबतचा आकस जनतेसमोर अगदी स्पष्टच झाला आहे. आपण मुख्यमंत्री असतानाही गप्प का ? तेव्हा मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या मनातील संभ्रम दूर करवा आणि जाआरला स्थगिती दिलीय की नाही हे स्पष्ट राज्याला सांगावे. अन्यथा हा सवळागोंधळ बघून तुम्ही फक्त लॉकडाऊन घोषित करण्यापुरते मुख्यमंत्री झालेले आहात का ? असा प्रश्न महाराष्ट्राच्या बहुनजनांना पडेल, असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे.