कृष्णा नदीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मित्रांसोबत कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावर जेवण करण्यासाठी गेलेला युवक आंघोळीसाठी पाण्यात उतरला असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. या युवकाचा मृतदेह आज (गुरुवार) सापडला. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि.४) सायंकाळी कसबे डिग्रज-मौजे डिग्रज बंधाऱ्याजवळ घडली होती.

वैभव सुधाकर पांढरे (वय ३२, रा. कसबे डिग्रज) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078W4XMLX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9f8122f7-8066-11e8-9f57-650487f926af’]

मृत वैभव व त्यांचे दोन मित्र राजू पांढरे आणि किशोर पांढरे हे जेवणासाठी बुधवारी नदीकाठी गेले होते. दरम्यान, आंघोळ करण्यासाठी तिघांनी कसबेडिग्रज बंधाऱ्यावरुन नदीत उड्या मारल्या. राजू आणि किशोर हे दोघेजण पोहत नदीकाठावर आहे. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने वैभव हे पाण्यात वाहून गेले. त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र, ते सापडले नाहीत.

गुरुवारी येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या टीमने वैभव यांचा मृतदेह शोधून काढला. बंधाऱ्यापासून काही अंतरावर वैभव यांचा मृतदेह सापडला. स्पेशल रेस्क्यू टीमचे महेश गव्हाणे, स्वप्नील धुमाळ, आनंद आठवले, कैलास वडर, राजू कांबळे, मयूर बिराजदार, राहुल धोकटे आदींसह त्यांच्या सहकाऱ्यांनी कृष्णा नदीत शोधमोहीम राबवली. कसबे डिग्रजचे उपसरपंच प्रमोद चव्हाण, ग्रामविकास अधिकारी लखन सनदी, कुमार लोंढे, गजानन गावडे, संदीप निकम आदींनी यासाठी प्रयत्न केले.