निष्काळजीपणा ! 9 महिन्यापासून PM केअर फंडातील 25 व्हेंटिलेटर्स धूळखात

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाची बिकट अवस्था झालेली आहे. बाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली असली तरी मृत्यूचे प्रमाण कायम आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे रेमडेसिविर, ऑक्सिजन त्याचबरोबर व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत असताना आता बिहारमधील दरभंगा येथे पीएम केअर्समधून देण्यात आलेले आयसीयू सेटअपसह २५ व्हेंटिलेटर गेल्या नऊ महिन्यापासून धूळखात पडल्याचे समोर आले आहे. व्हेंटिलेटर असूनही त्याचा वापर का केला गेला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आयसीयू सेटअप सह व्हेंटिलेटर्स मिळाले हाेते. या व्हेंटिलेटर्सना वापरासाठी तयार करण्यात येत असताना ड्राय-रन प्रक्रिया यशस्वीरित्या सुरू झाली नाही. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने न झाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरु झाल्याशिवाय व्हेंटिलेर्स न वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डीएमसीएचचे अधीक्षक डॉ मणि भूषण यांनी सांगितले. ऑक्सिजन प्लांटची या ठिकाणी उभारणी करण्यात येत असून लवकरच ड्राय रन प्रक्रियेची चाचणी करण्यात येणार आहे. त्यानंतरच हे व्हेंटिलेटर्स वापरण्यात येतील असेही भूषण म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासातील कोरोनाच्या परिस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला आह. त्यानुसार गेल्या २४ तासात देशात दोन लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे तर तीन लाख ८९ हजार ८५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ४ हजार ५२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.