खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ पुन्हा सुरु होण्याची शक्यता

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या संकटामुळे एप्रिलमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यातील वाढ १ जुलै, २०२१ पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता हि महागाई भत्तावाढ २०२१ मध्ये पुन्हा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होऊ शकते. याआधीची ४ टक्के वाढ जानेवारीत प्रस्तावित करण्यात आली होती. मार्चमध्ये त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती.

वाढत्या महागाईनुसार, सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ करते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना १७ टक्के दराने महागाई भत्ता मिळतो. सातव्या वेतन आयोगानुसार, जुलै, २०२१ पासून तो २१ टक्के होणे अपेक्षित आहे. स्थगितीचा कार्यकाळ संपल्यानंतर महागाई भत्त्यात नियमित पद्धतीने वाढ केली जाईल, अशी आशा कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना वाटते. याचा केंद्र सरकारचे ५० लाख कर्मचारी तर ६० लाख निवृत्तिवेतनधारकांना याचा लाभ होणार आहे.