लाथ मारून लोकलमधून प्रवाशाला ढकलले

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंब्रायेथील एका तरूणाला रागाच्या भरात सहप्रवाशाने लोकलमधून लाथ मारून ढकलल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही ठाण्याहून बदलापूरला निघालेल्या लोकल ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी घडली. या तरुणाची सहप्रवाशाशी बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाले. रागाच्या भरामध्ये सहप्रवाशाने तरुणास लाथ मारली असता चालत्या ट्रेनमधून हा तरुण रेल्वे रुळावर पडला.
लोकलमधून ढकलण्यात आलेल्या तरूणाचे नाव जासिर शेख (१९) असे असून तो मुंबईतील ग्रँट रोड परिसरात काम करतो. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला पकडले होते, परंतु तो दुसराच प्रवासी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी संशयित व्यक्तीला सोडून दिले. जासिर डब्यात चढल्यानंतर त्याचा धक्का एका प्रवाशाला लागल्याने त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली. त्यावेळी गाडीतील काही प्रवाशांनी समजावण्याचा प्रयत्न केला तर काही जण मजा पाहत असल्याचे जासिरने म्हटले आहे. कळवा स्थानक सुटल्यानंतर जासिरचा पाय सहप्रवाशाला लागल्यानंतर त्यावरून पुन्हा शाब्दिक चकमक सुरू झाली.
रागाच्या भरात सहप्रवाशाने लाथ मारल्याने खांबाचा हात सुटून जासीर रुळांवर कोसळला. त्याला दुखापत झाली परंतु त्याने तेथून एका मोटरसायकलस्वाराच्या मदतीने मुंब्रा गाठले व तेथून ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात पोहोचला. तेथे एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. परंतु लाथ मारणारा तो व्यक्ती नसल्याने पोलिसांनी त्यास सोडून दिले. या प्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, जासीर याला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. प्रचंड गर्दीमुळे लोकलमधील प्रवाशांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाजी व हाणामारीचे प्रकार नेहमीच घडत असतात. अलिकडे या घटनांमध्ये वाढ झाली असून क्रुरता वाढत चालली आहे. या घटनेत सुदैवाने तरूणाचे प्राण वाचले आहेत. जेव्हा हा प्रकार घडला त्याचवेळी बाजूच्या रूळावर दुसरी लोकल आली असती तर मोठा अनर्थ घडला असता.
जाहिरात