दिलासादायक ! गरिबांना मोफत अन्न मिळण्यासाठी आठवड्याचे सातही दिवस सरकारी रेशन दुकाने उशीरापर्यंत उघडी ठेवा – केंद्राकडून राज्यांना निर्देश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्राने रविवारी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना महिन्याचे सर्व दिवस आणि उशीरापर्यंत रेशन दुकाने उघडी ठेवण्यासाठी निर्देश देण्यास सांगितले आहे. गरीबांना या काळात वेळेवर आणि सुरक्षित प्रकारे सबसिडीयुक्त आणि मोफत धान्य मिळावे हा हेतू आहे.

याबाबत केंद्रीय अन्न मंत्रालयाने पत्रक जारी केले आहे. मंत्रालयाला ही माहिती मिळाली होती की, काही राज्यांनी आणि केंद्र शासित प्रदेशांनी कोरोना व्हायरस महामारी रोखण्यासाठी लावलेल्या लॉकडाऊनमुळे रेशन दुकानांचा कालावधी कमी केला आहे. यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळवण्यासाठी अडचण येत आहे.

मंत्रालयाने वक्तव्यात म्हटले की, लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी रेशन दुकानांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत. हे पहाता अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने 15 मे 2021 ला सूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, रेशनची दुकाने महिन्याचे सर्व दिवस उशीरापर्यंत उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी.

केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) अंतर्गत प्रति व्यक्ती 5 किलो धान्य एक ते तीन रुपये किलोच्या दराने 80 कोटीपेक्षा जास्त गरीब कुटुंबाना उपलब्ध करत आहे. याशिवाय, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकेएवाय) अंतर्गत दोन महिने…मे आणि जून…साठी त्याच लाभार्थ्यांना मोफत प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जात आहे जेणेकरून कोविड महामारीची दुसरी लाट आणि तिला रोखण्यासाठी लावलेल्या ‘लॉकडाऊन’ आणि इतर प्रतिबंधांचा प्रतिकुल परिणाम गरीबांवर पडू नये.