छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन (अरुण ठाकरे) – सह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ल्यांचे संवर्धन करत असतांना सह्याद्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील पहिला मानाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या भव्य दिव्या पालखी सोहळ्याचे हे १० वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे ०३ फेब्रुवारी ते ०७ फेब्रुवारी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते शिवतीर्थ किल्ले रायगड असा हा पालखी सोहळा काढण्यात येतो.

palakhi

सह्याद्री प्रतिष्ठान संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या प्रेरणेने संपूर्ण सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून मोठ्या उत्साहाने दुर्ग संवर्धनाचे कार्य चालू असते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा, पराक्रमाचा व दुर्गसंवर्धन कार्याचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी या पालखी सोहळ्याचे दरवर्षी वेगवेगळ्या मार्गाने नियोजन केले जाते. या नियोजन मार्गात पारंपरिक पद्धतीने, लेझीम, रांगोळी तर शंक वाजवून गावागावात, शहरात पालखीचे स्वागत केले जाते. तसेच ठिकठिकाणी व्याख्यान, पोवाडे, मर्दानी खेळ, लोककला अश्या अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

महाराजांची पालखी आपल्या गावात, शहरात दाखल होताच गावकरी, महिला, लहान मुले आनंदाने दर्शनासाठी निघतात तर बैलगाडी सजवून फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताश्यांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने यंदाही मिरवणूक काढली गेली. पालखी रायगडाच्या दिशेने मार्गस्थ होत असतांना प्रत्येक जण पालखीची वाट पाहत असतो. मोठया उत्साहाने मावळे पालखीला खांद्यावर घेऊन आनंदित होत असतात. या पालखी सोहळ्यास महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त, दुर्गंसेवक उपस्थित राहतात.

palakhi sohala

मुरबाड तालुक्यातील धसई येथे या पालखीचे मोठ्या दिमाखाने स्वागत करून ढोल पथकाने मिरवणूक काढून मुरबाड तालुका सह्याद्री प्रतिष्ठान अध्यक्ष अजिंक्य हरड आणि सहकाऱ्यांनी इतिहासाला उजाळा देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होतो. जगप्रसिद्ध आजीबाई शाळेचे शिक्षक योगेंद्र बांगर यांचे व्याख्यान, शाहिद भाई कोतवाल चित्रपटाचे निर्माते एकनाथ देसले सर, रायगड भूषण शाहिर वैभव घरत, पत्रकार अरुण ठाकरे, दुर्ग संवर्धन गीत पंकज हरड यांच्या बहारदार गीतांनी अवघे मावळे भारावून गेले होते. या पालखी सोहळ्यात मावळे आपली कामगिरी जबादारीनी पार पाडत असल्याचे चित्र दिसून आले. शिवरथ यात्रेमुळे गावो गावी रयतेच्या मनात आणि नवतरुणांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते.

पाचाड येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पालखी किल्ले रायगडवर नेण्यात येते. किल्ले रायगड वर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीचा मान यंदा सह्याद्री प्रतिष्ठान मुरबाड व सह्याद्री प्रतिष्ठान कर्जत विभागास देण्यात आला. गडावर प्रथम श्री शिरकाई देवीच्या मंदिरात पालखी ठेवून तिथे देवीची पूजा करून मग पालखी जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात नेण्यात आली. ढोल ताश्याचा गजरात पालखीचे स्वागत दरबारात करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेताना ज्या जंगम घराण्यातील पुजारी कडून अभिषेक करून घेतला होता त्याच जंगम घराण्यातील स्वामींकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तिला अभिषेक करण्यात आला.

जंगजौहर या चित्रपटाच्या स्क्रिप्ट चे पूजन करून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे यावेळी सन्मान करण्यात आले. दिलीपसिंह घोरपडे, शाहिर वैभव घरत व शाहिर प्रवीण फणसे यांच्या बुलंद आवाजातील पोवाडे, सह्याद्री प्रतिष्ठानची मुलुख मैदानी तोफ नितीन बानूगडे पाटील यांच्या व्याख्यान ऐकताना सर्व शिवभक्त मंत्रमुग्ध झाल्याचे दिसून आले. या भव्यदिव्य सोहळ्यास महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त, दुर्गंसेवक उपस्थित होते. या शिवपालखी सोहळ्याची यंदा दशकपूर्ती झाली असून दरवर्षी करण्यात येणाऱ्या नियोजनामुळे सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्रभर कौतुक केले जात आहे.