Chakan : कोरोनाबाधित रुग्णाकडून ‘वाढीव’ बिल घेणाऱ्या हॉस्पिटलवर FIR, 4 डॉक्टर फरार

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णाकडून नियमापेक्षा अधिक पैसे उकळणाऱ्या हॉस्पिटलवर चाकण Chakan पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणमधील Chakan क्रिटीकेअर रुग्णालयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल होताच चार डॉक्टर फरार झाले आहेत. याप्रकरणी रुग्णाच्या पत्नीने जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार बिलाचे ऑडीट केले असता रुग्णालयाने शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम स्विकारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हॉस्पिटलवर चाकण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्ही ‘मातोश्री’चे संबंध तोडले नाहीत, ‘मातोश्री’चं आमंत्रण आम्ही स्विकारलं; भाजप नेत्याचं सूचक विधान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय लक्ष्मण पोखरकर (रा. ओझर, ता. जुन्नर) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना 1 सप्टेंबर 2020 रोजी लेण्याद्री येथील शासकीय कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी चाकण येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजय पोखरकर यांचा 13 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. हॉस्पिटलने 2 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधी मधील उपचाराचे 5 लाख 63 हजार 510 रुपये एवढे बिल आकारले. हे बिल विजय यांच्या पत्नी पुष्पा पोखरकर यांनी भरले.

हॉस्पिटलने पोखरकर यांच्याकडून घेतलेले बिल शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे नसल्याने पुष्पा पोखरकर यांनी पुणे जिल्हा शल्यचिकीस्तक, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चाकण यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. जिल्हा शल्यचिकित्सकांनी यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा गणपत ढवळे यांना दिले होते. डॉ. नंदा ढवळे यांनी नगरपरिषदेचे लेखापाल शंकर कड यांच्याकडून बिलाचे ऑडिट करुन घेतले. त्यावेळी पुष्पा पोखरकर यांनी 4 लाख 3 हजार 200 रुपयांची बिले लेखापरिक्षणासाठी सादर केली. या बिलांचे ऑडिट केले असता शासकीय नियमानुसार 1 लाख 49 हजार 900 रुपये होत असताना हॉस्पिटलने 2 लाख 53 हजार 300 रुपये जास्तीचे घेतल्याचे समोर आले. हॉस्पिटलने पुष्पा पोखरकर यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने डॉ. नंदा ढवळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना हॉस्पिटलने जास्तीचे बिल आकारल्याचा प्रस्ताव दिला.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल प्राप्त झाल्यानंतर क्रिटीकेअर हॉस्पिटलला पत्र पाठवून पोखरकर यांच्या कडून घेतलेले जास्तीचे बिल परत करण्यास सांगितले होते. मात्र, हॉस्पिटलने पैसे परत न केल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा ढवळे यांनी क्रिटीकेअर हॉस्पिटल व संचालक मंडळ डॉ. स्मिता घाटकर, डॉ. राहूल सोनवणे, डॉ. सीमा गवळी व डॉ. घाटकर यांच्या विरोधात फिर्याद दिली. चाकण पोलिसांनी भादवी कलम 406,420,188 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व डॉक्टर फरार झाले असून हॉस्पिटलला नोटीस बजावण्यात आली आहे.

पुढील तपास पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड करित आहेत.

READ ALSO THIS :

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून