उध्दव ठाकरेंनी घेतला ‘कोरोना’च्या लशीचा पहिला डोस, मुख्यमंत्र्यांनी दिला ‘हा’ सकारात्मक संदेश, जाणून घ्या

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.11) मुंबईतील जे. जे. रुग्णालयामध्ये कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांचा लसीचा डोस घेतानाचा फोटा ट्विट करत ही माहिती दिली आहे.

कोरोनाची लस घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे कुटुंबियासह दुपारी साडेबारा वाजता जे.जे. रुग्णालयात दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्र्याची प्राथमिक तपासणी करून त्यांना लस देण्यात आली. त्यानंतर त्यांना अर्धा तास देखरेखीखाली ठेवले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोव्हिशिल्ड ही लस घेतल्याचे सांगितले जात आहे. यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मी कोविडची लस घेणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी आज कोविडची लस घेतली आहे.

लस घेत सर्वांनीच लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असा संदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी जनतेला दिला आहे. कोविड लस टोचून घेताना काहीच कळत नाही. या लसीबाबत कोणत्याही प्रकारची भीती किंवा मनात संभ्रम बाळगू नये, असे ते म्हणाले. तसेच राज्यात कोरोनाचा धोका वाढत असून जे लसीसाठी पात्र नागरिक आहेत, त्यांनी ही लस घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबरच मिलिंद नार्वेकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली आहे.