चीनची खुमखुमी ! तिबेटपासून कालापानीपर्यंत भारतालगतच्या बॉर्डरवर तैनात केल्या आणखी तोफा, सैन्यबळ देखील वाढवलं

नवी दिल्ली : चीनने पुन्हा एकदा भारतालगतच्या सीमेवर मोठ्या संख्येने तोफा आणि सैनिक तैनात केले आहेत. न्यूज एजन्सी आयएएनएसने सूत्रांच्या संदर्भाने म्हटले आहे की, या तोफा तिबेटच्या 4,600 मीटर उंचीवरील प्रदेशात तैनात केल्या आहेत. इतकेच नव्हे, चीनने तिबेटच्या सैन्य जिल्ह्यात 77 कांबॅट कमांडच्या 150 लाईट कंबाईन्ड आर्म्स ब्रिगेडची तैनात केल्या आहेत. जगासमोर शांततेचा सूर आळवणार्‍या चीनच्या हेतूवर यामुळे शंका व्यक्त केली जात आहे.

भारतालगतच्या सीमेवर सैन्य तैनात
सूत्रांचे म्हणणे आहे की, चीनने तिबेटच्या अतिउंचावरील क्षेत्रात सैन्य अनेकपटींनी वाढवले आहे. चीनने कंबाईन्ड आर्म्स ब्रिगेडची तैनाती भारताला लागून असलेल्या लाइन ऑफ अ‍ॅक्च्युल कंट्रोलच्या जवळ आहे. चीनने कंबाईन्ड आर्म्स ब्रिगेडची स्थापना अमेरिकेची कॉपी करून केली आहे. हे अमेरिकन ब्रिगेड कंबॅट टीमचे अडॅप्टेशन आहे, ज्यातून विविध सैन्यदलांना एकसाथ काम करण्यास मदत मिळते.

कालापानी खोर्‍याच्या वरपर्यंत सैन्य तैनात
सूत्रांनी सांगितले की, चीनने या तोफा आणि दुसरी मोठी शस्त्रे प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजे एलएसीचे तीन सेक्टर, पश्चिम (लडाख), मध्य (उत्तराखंड, हिमाचल प्रदेश) आणि पूर्वेकडील सेक्टर्स (सिक्किम, अरुणाचल प्रदेश) मध्ये तैनात केली आहेत. एवढेच नव्हे, चीनी सैन्याने आपल्या जवानांना मोठ्या संख्येने उत्तराखंडच्या लिपुलेखजवळ भारत, चीन आणि नेपाळच्या तीन रस्त्यांवर कालापाणी खोर्‍याच्यावर सुद्धा तैनात केले आहे. विशेष म्हणजे भारतासोबत सैन्य कमी करण्याची चर्चा सुरू असताना चीनने हे सैन्य वाढवले आहे.

कायमस्वरूपी बांधकाम उभारले
सूत्रांचे म्हणणे आहे की, चीनने पुन्हा एकदा दिलेले अश्वासन झुगारून देत या तैनातींसह सीमावर्ती भागात कायमस्वरूपी बांधकामे उभारली आहेत. सीमेवरून सैन्य माघारी बोलावण्यासंदर्भात भारत आणि चीनमध्ये चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या आहेत. परंतु, चीनकडून अजूनही कुरापती सुरूच आहेत. चीनने हे अश्वासन दिले होते की, तो स्थिती पूर्ववत करण्यासाठी वादग्रस्त भागातून आपल्या सैनिकांना माघारी बोलावेल. 15 जूनला चीनी सैन्यासोबत झालेल्या हिंसक मारहाणीत भारतचे 20 जवान शहीद झाले होते.