मालाडमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह मालाडच्या मालवणी परिसरात आढळून आला. मंगळवारी (दि. 5) सकाळी येथील खारोडी परिसरातील मैदानात तरुणाचा मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली. या तरुणाचा गळा चाकूने चिरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या हत्येचे कारण समजू शकले नाही.

अशोक यादव (वय 35 रा. खारोडी ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही नागरिकांना तरुणाचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अशोक यादव असे मृत तरुणाचे नाव असून तो त्याच परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.