आयटीआय विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची समकक्षता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीची समकक्षता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना समकक्षता देण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

जे विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये ज्या अभ्यासक्रमाची अर्हता दहावी अनुत्तीर्ण आहे असे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले असतील अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरिता क्रेडिट्स देण्यात येतील. आयटीआयमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमांची शैक्षणिक अर्हता दहावी अनुत्तीर्ण अशी आहे त्याऐवजी ती यापुढे दहावीच्या गुणपत्रिकेतील बदलामुळे कौशल्य विकासास पात्र असे नमूद करण्यात येईल. याचबरोबर जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयमध्ये ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश अर्हता इयत्ता दहावी अशी आहे, असा दोन वर्षाचा व्यवसाय अभ्यासक्रम आयटीआय मधून उत्तीर्ण करतील त्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरिता क्रेडिट्स देण्यात येतील.

आयटीआय मधील इच्छुक विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी अथवा बारावी प्रमाणपत्र परीक्षेकरिता नोंदणी करता येईल. आयटीआय मधील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता जास्तीत जास्त 4 व्यवसाय विषयांचे क्रेडिटस घेता येतील. आयटीआय मधील व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमाल गुणांचे रुपांतर राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता कमाल 400 गुणांमध्ये करता येईल.

विद्यार्थ्याला दहावी आणि बारावीत उत्तीर्ण होण्याच्या विषयांच्या गरजेनुसार कमाल 4 व्यवसाय विषयांची (कमाल 400 गुण) निवड दहावी आणि बारावीच्या समकक्षतेकरिता क्रेडिट्स प्राप्त करण्यासाठी करता येईल. तसेच या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या सर्वोत्तम 5 (बेस्ट ऑफ फाईव्ह) योजनेचा लाभ मिळेल.

विद्यार्थ्यांच्या आयटीआय अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेतील विद्यार्थ्यास प्राप्त गुणांचे रुपांतर त्याने निवडलेल्या क्रेडिट्सप्रमाणे राज्य मंडळाकडे देण्याची जबाबदारी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाची राहील. या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये नियमानुसार आवश्यक दोन भाषा विषय उत्तीर्ण होणे तसेच पर्यावरणशास्त्र आणि ग्रेड विषयांमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. ग्रेड विषयांकरिता विद्यार्थ्यांना जवळची शाळा निवडण्याची मुभा राहील.

इयत्ता दहावीची समकक्षता मिळालेला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थी अकरावीसाठी कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकेल. बारावीची समकक्षता मिळालेला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थी बारावी एमसीव्हीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तद्नंतर ज्या शाखांमध्ये उच्च शिक्षणाकरिता प्रवेश घ्यायचा आहे त्या सर्व शाखांमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत.