वाराणसीत सुवर्णपदक विजेत्या पूनम यादववर हल्ला

वाराणसी : वृत्तसंस्था
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पूनम यादववर वाराणसीत हल्ला झाल्याची घटना घडली.
पुनम तिच्या चुलत बहिणीच्या घरी वाराणसी जवळील मुंगवार गावात गेली असताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या गावच्या प्रधानासोबत वाद झाला. त्यानंतर याचे रुपांतर मारहाणीत झाले.

त्या प्रधानाच्या समर्थकांनी पुनमसह तिच्या भावावर काठी, दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे पुनम आपल्या कुटुंबीयांसह तेथून निघून गेली. या हल्लात तिला कोणतीही जखम झाली नाही. मात्र यावेळी वाहनांची तोडफोड झाली. या प्रकरणी रोहनिया पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कुटुंबीयांमध्ये जुना वाद आहे. पुनम यामध्ये पडली असताना तिच्यावरही हल्ला झाला. पुनमने नुकतेच ऑस्ट्रेलियातील राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले होते. तिने एकूण 222 किलो वजन उचलून हे सुवर्ण पदक मिळविले आहे.