सुट्टीचे औचित्य साधून शहरवासियांची पर्यटनस्थळांकडे धाव

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे मागिल वर्षभर कोणालाही देवदर्शन, पर्यटनाला जाता आले नाही. कोरोना आटोक्यात आल्यानंतर अनलॉकनंतर सर्व व्यवहार मागिल चार-पाच महिन्यांपासून सुरळीत होऊ लागले आहेत. त्यातच नव्या वर्षामध्ये प्रजासत्तादिन आणि जोडून आलेली शनिवार-रविवारच्या सुट्टी आणि सोमवारची एक दिवस सुट्टी घेऊन पर्यटनस्थळाकडे अनेकांनी धाव घेतली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या प्रचंड गर्दी झाली आहे.

शहर आणि उपनगरातील मंडळींबरोबर पक्षीनिरीक्षकांनी पानथळाकडे धाव घेतली आहे. अनेकांनी हुर्डा पार्ट्यांमध्ये दंग झाले आहेत. हुर्डा, मका कणिस, ओला हरभरा, चिंचा, बोरं अशा गावरान मेव्याचा आस्वाद अनेक मंडळी घेत आहेत. तसेच काहींना मागिल वर्षभर गावाकडे जाता आले नाही, त्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. आई-वडिल, भाऊ-बहिण यांच्या भेटीगाठी घेण्याला अनेकांनी प्राधान्य दिले आहे. तसेच दहावी-बारावीतील मुलांच्या पालकांनी मात्र पर्यटनापेक्षा मुलांच्या अभ्यासाकडे जास्तीचे लक्ष केंद्रित केले आहे. शाळा-महाविद्यालये बंद होती. मात्र, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू होती. मात्र, खासगी क्लासेस बंद असल्याने मुलांची दहावी-बारावीच्या मुलांची तयारी कमी झाल्याची रुखरूख पालकांना लागून राहिली आहे. आता पुढील चार महिन्यात मुलांना खासगी क्लास आणि शाळा-महाविद्यालयातील अभ्यासासाठी जास्त वेळ देण्याचे ठरविले आहे. आता कुठे पर्यटन, देवदर्शन वा गावाकडे जाण्याचे नियोजन नको, अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अलिबाग, मुरुड, किहीम, लोणावळा, जुन्नर अशा ठिकाणी शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी वाढू लागली होती. चौथ्या शनिवारची सुट्टी, रविवार, सोमवार आणि मंगळवारचा प्रजासत्ताक दिन अशा चार सुट्ट्या साधून अनेकांनी शहरातून पर्यटनस्थळांकडे धाव घेतली. ३१ डिसेंबरच्या साजरीकरणावर रात्रीच्या संचारबंदीमुळे निर्बंध आले होते. त्याचा पर्यटनावरही काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यातील मोठी सुट्टी आणि पुन्हा अवतरलेली थंडी हा योग साधून शहरवासीयांनी पर्यटनस्थळे गाठली. ‘जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात पर्यटकांची संख्या अतिशय कमी झाली होती, मात्र या आठवड्यापासून पुन्हा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुढील १५ दिवस असाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा पर्यटनस्थळावरील नागरिकांनी व्यक्त केली.

आडबाजूच्या पर्यटनस्थळांना भेट देण्याचा पर्यटकांचा कल आहे. १५ दिवसांपूर्वीच सर्व नोंदणी पूर्ण झाली आहे. विशेषत: २४ ते २६ जानेवारी या कालावधीसाठी चौकशी करणाऱ्यांना नकार द्यावा लागत आहे, असे जुन्नरजवळील पराशर कृषी पर्यटन केंद्रांच्या प्रमुखांनी सांगितले. ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्ट्सना मोठा प्रतिसाद मिळत असून माळशेज, भंडारदरा येथील रिसॉर्ट पूर्ण भरले आहेत.

रात्रीच्या संचारबंदीमुळे नववर्ष स्वागताच्या वेळी कॅम्पिंगवर बंदी होती. मात्र या आठवड्याच्या अखेरीस काही ठिकाणी कॅम्पिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘चार दिवसांच्या सुट्टीत कॅम्पिंगला सुमारे ६० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे, पवना लेक कॅम्पिंगच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच हौशी डोंगरभटकेदेखील या सुट्टीत बाहेर पडल्याचे दिसून येत आहे.

संथगती पुणे-मुंबई आणि पुणे-मुंबई ते गोवा महामार्गावर सकाळी काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पुण्याला जाताना सकाळी १०च्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे अनेकांना संताप व्यक्त केला.