तिसऱ्या टप्प्यातील चाचणी न करताच परवानगी दिली कशी ?, कोवॅक्सिन लसीसंदर्भात कॉंग्रेस नेते शशी थरूरांचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप झालेली नाही. कोवॅक्सिनला अपत्कालीन मंजुरी देणे धोकादायक ठरू शकते. याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच कोरोना लसीचे ट्रायल पूर्ण होईपर्यंत याचा वापर टाळावा असे कॉंग्रेस नेते शशी थरूर (Congress leader Shashi Tharoor) यांनी म्हटले आहे. तसेच देशात सध्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस वापरली पाहिजे असेही त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी डीसीजीआयने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला परवानगी देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.

भारत बायोटेकच्या लसीबाबत उद्भवणार्‍या प्रश्नांवर डीसीजीआयलाही स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. जोपर्यंत या लसीचा वापर करणारे लाभार्थी या लसीविषयी माहिती घेतल्यानंतर संमतीवर स्वाक्षरी करणार नाहीत, तोपर्यंत भारत बायोटेकच्या लसीला मंजुरी दिली जाणार नाही. लसीची जोपर्यंत चाचणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला पूर्णपणे मंजुरी दिली जाणार नाही, असे डीसीजीआयच्यावतीने सांगण्यात आले आहेत.

दरम्यान, रविवारी डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी दिली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येऊ शकतात, असे डीसीजीआयने म्हटले आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी 110 टक्के सुरक्षित आहेत, असे व्हीजी सोमाणी यांनी म्हटले आहे.