काँग्रेस पक्ष गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा करणार

गोवा : वृत्तसंस्था

सर्वात जास्त आमदार निवडून आल्याने जसे कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापनेची संधी दिली, तशीच काँग्रेस पक्षाला गोव्यात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेची संधी द्यावी या मागणीसाठी उद्या काँग्रेसचे गोव्यातील आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. जो न्याय कर्नाटकात भाजपला दिला आहे तोच न्याय काँग्रेसला गोव्यात मिळावा यासाठी काँग्रेस आमदार उद्या राज्यभवनात जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेची मागणी करणार आहेत.

कर्नाटकमधील निकालानंतर झालेल्या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आज (गुरुवार) सकाळी नऊ वाजता भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच येत्या 15 दिवसात बहुमत सिद्ध करा, असेही राज्यपालांनी सांगितले आहे. यांनतर काँग्रेस नेते तसेच जेडीएस नेत्यांनी राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केली होती. यांनतर कर्नाटकात मोठा पक्ष ठरल्याने जो न्याय भाजपला दिला आहे तो इतरत्र तेथील मोठ्या पक्षाला मिळावा अशी चर्चा सुरु झाली आहे.

गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार आज गोव्याला दाखल होणार असून ते आणि पक्षाचे इतर नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. गोव्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस करणार आहे. गरज पडल्यास राजभवनात काँग्रेस आपल्या सर्व आमदारांना हजर करणार आहे, अशी माहिती पक्षाचे नेते यातिश नाईक यांनी दिली आहे.

2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 17 जागांसह मोठा पक्ष ठरुनही 13 जागा मिळवलेल्या भाजपने राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे कर्नाटकचा न्याय गोव्यातही लागू करावा, अशी मागणी करत मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा काँग्रेसने केला आहे. यामुळे गोव्यातील भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.