Coronavirus : आपत्ती निवारणासारखेच होणार लस वाटपाचे काम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश

नवी दिल्ली : कोरोना लस वाटपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी म्हटले आहे की, आपत्ती निवारणात यंत्रणा जशा काम करतात, तशाच प्रकारे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी यंत्रणा राबविली जाणे आवश्यक आहे. सर्व सरकारी, नागरी संस्थांना या मोहिमेत सामील करून घ्यावे, असे मोदी यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोनाची स्थिती, कोरोना लस वितरित करण्यासाठीची पूर्वतयारी इत्यादीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी या बैठकीत म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी बेसावध राहू नका. संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शथीर्चे प्रयत्न आवश्यक आहेत.

मात्र, तज्ज्ञांनी पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीत स्पष्ट केले की, पुढील वर्षी मार्च-एप्रिलच्या अगोदर कोरोना लस विकसित होणे कठीण आहे. भारत बायोटेक, आयसीएमआरच्या कोव्हॅक्सिन व झायडसकॅडिलाच्या लसीची मानवी चाचणी दुसर्‍या टप्प्यात आहे. तसेच सिरम-अ‍ॅस्ट्रोझेनिसाच्या कोव्हिशिल्ड लसीची मानवी चाचणी सध्या तिसर्‍या टप्प्यात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने रेमडेसिवीर औषधाच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे औषध वापरल्याने कोरोना रुग्ण लवकर बरा होतो या गोष्टीत तथ्य नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच जाहीर केले होते. भारतात रेमडेसिवीरचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आता या औषधाच्या वापरावर नियंत्रक यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवत आहेत. रेमडेसिवीर औषध मनमानी किमतीने देशभरात विकले जात आहे.