Coronavirus : तोंडात ‘कोरडेपणा’ किंवा ‘खाज’ येणे ही कोरोना व्हायरसची नवीन लक्षणे ! डॉक्टरांनी व्यक्त केली शंका

बेंगळूरू : बेंगळुरूमध्ये डॉक्टरांना कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये एक विशेष लक्षण आढळले आहे, ज्यास ते कोविड जीभ (Covid Tongue) म्हणत आहेत. अशा बाबतीत तोंडात कोरडेपणाशिवाय रूग्णांमध्ये कोरोनाची इतर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. कोविड टास्क फोर्सचे एक सदस्य डॉ. जी.बी. सत्तूर यांनी म्हटले की, हायपरटेन्शनमधून जात असलेल्या 55 वर्षांच्या एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क केला होता आणि तो अति प्रमाणात तोंडातील कोरडेपणामुळे त्रस्त होता. नंतर त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

बेंगलोर मिररच्या एका रिपोर्टनुसार, डॉ. सत्तूर यांनी म्हटले, जेव्हा मी त्यांची ब्लड शुगर चेक केली, तेव्हा ती सामान्य होती, परंतु ईएसआर सामान्यपेक्षा जास्त निघाला. मी ऐकले होते की, कंजक्टिवायटिस कोरोनाचे एक लक्षण असू शकते. मात्र, रुग्णाला ताप नव्हता. त्यांनी म्हटले होते की, ते खुप थकलेले आहेत. यामुळे शंका वाटली की हे कोविड-19 चे एक लक्षण असू शकते. नंतर मी त्यांना आरटी-पीसीआर टेस्ट करायला सांगितली, जी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि आता ते ठिक आहेत.

दरम्यान डॉक्टर कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणाच्या मागील कारण जाणून घेण्याच्या मागे लागले आहेत. डॉ. सत्तूर यांनी शक्यता व्यक्त केली की, कोरोनाच्या यूके, ब्राझील किंवा भारतात आढळलेल्या पहिल्या डबल म्यूटंटच्या प्रमाणे एखाद्या नवीन व्हेरियंटमुळे असे होऊ शकते. यासोबतच त्यांनी सांगितले की, तोंडात कोरोनाची सुरुवात प्रामुख्याने चिडचिडेपणा, खाज आणि तोंडातील कोरडेपणासह होते. त्यानंतर रुग्णाला ताप न येता कमजोरी जाणवू लागते.

डॉ. सत्तूर यांनी म्हटले, डॉक्टरांनी तोंड किंवा जीभेबाबत येत असलेल्या तक्रारींवर लक्ष ठेवले पाहिजे आणि त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कोरोनाच्या व्हेरियंटला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सरकारने सुद्धा जीनोम सीक्वेन्सिंगकडे आणखी लक्ष केंद्रीत केले पाहिजे.