Pune News : बेड न मिळाल्याने अखेरचा श्वास घरातच घेतला, पालिकेची हेल्पलाईन कुचकामी; पुण्यातील दुर्देवी घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच एका कोरोनाबाधित 51 वर्षीय व्यक्तीला वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने घरातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औंधमधील आंबेडकर वसाहतीत घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिवार आणि वसाहतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान नागरिकांना बेड मिळत नसल्याने तसेच पालिकेच्या हेल्पलाईन देखील नागरिकांची मदत करण्यास असमर्थ ठरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

संतोष ठोसर असे त्यांचे नाव असून मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबतची माहिती अशी की, गेल्या काही दिवसापूर्वी संतोष यांना कोरोनाची लागण झाली होती. 2 दिवस कुटुंबियांनी महापालिकेने दिलेल्या सर्व नंबर वर कॉल केले. पण हे नंबर सारखेच व्यस्त येत होते. कोणीही याची दखल घेत नसल्याचे दिसून आले. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्यामुळे शास्वत हॉस्पिटल व मेडिपॉइंट हॉस्पिटल जवळच्या रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतू दोन्ही हॉस्पिटलने कोरोनाचा रुग्ण असल्याने दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर औंध – बोपोडी – बाणेर परिसरातील हॉस्पिटलमध्ये बेडबाबत चौकशी केली. पण एकही बेड शिल्लक नसल्याचे रुग्णालयाने सांगितले. शेवटी एकही बेड शिल्लक नसल्याने संतोष ठोसर यांचा घरातच मृत्यू झाला. दरम्यान बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.