‘कोरोना’ व्हायरसमुळं जाऊ शकतो 4.5 कोटी लोकांचा जीव, जगातील 60 % लोकसंख्येला ‘धोका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान प्रांतात पसरलेल्या प्राणघातक कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत 1,110 लोकांचा मृत्यू झाला असून, 44,653 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर हाँगकाँगमधील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसचा प्रसार थांबविला नाही तर जगातील 60 टक्के लोकसंख्या प्रभावित होऊ शकते. सार्वजनिक आरोग्य औषध प्रमुख प्रोफेसर  गेब्रियल लेउंग  यांनी सांगितले कि,  कोरेनाव्हायरस प्रतिबंधक उपाययोजना अपयशी ठरल्यास जगातील 60 टक्के लोकांवर प्राणघातक विषाणूचा परिणाम होऊ शकतो. तसेच आतापर्यंत या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण एक टक्का आहे, परंतु तरीही लाखो लोक मरू शकतात. यामुळे जगातील 60 टक्के लोक धोक्यात आहेत.

सध्या, जगातील लोकसंख्या सात अब्ज आहे, अशा प्रकारे कोरोनाव्हायरस जगातील चार अब्ज लोकसंख्या संक्रमित करू शकते. प्राध्यापक लेऊंग यांचा दावा खरा असल्यास आणि त्याच वेगाने विषाणूचा प्रसार होत राहिल्यास सुमारे साडेचार कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. दरम्यान, चीनमध्ये दररोज नवीन प्रकरणांची संख्या कमी होऊ लागली आहे, जी गेल्या आठ दिवसांत घटून पाचवर आली आहे.

डब्ल्यूएचओने कोरोनाव्हायरसला दिले नवीन नाव

यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, प्राणघातक कोरोनाव्हायरसचे अधिकृत नाव ‘कोविड -19’ असेल. चीनमध्ये प्रथमच 31 डिसेंबर 2019 रोजी व्हायरसची ओळख झाली. डब्ल्यूएचओचे प्रमुख तेदरोस अदहानोम गेब्रेयसेस यांनी जिनेव्हा येथे पत्रकारांना सांगितले की, आता आपल्याकडे या आजाराचे नाव आहे ते म्हणजे ‘कोविड -19’ आहे. ‘को’ म्हणजे ‘कोरोना’, ‘व्ही’ म्हणजे ‘विषाणू’ आणि ‘डी’ म्हणजे ‘रोग’ असे त्यांनी या नावाचे स्पष्टीकरण  दिले आहे.

चीनसह संपूर्ण जगाला मोठा धोका

डब्ल्यूएचओचे प्रमुखांनी सांगितले कि, व्हायरसचे 99 टक्के रुग्ण चीनमध्ये आहेत, परंतु यामुळे जगाला मोठा धोका आहे. यासंदर्भात झालेल्या कोणत्याही संशोधनाची माहिती सर्व देशांनी सामायिक करण्याचे आवाहनही त्यांनी केले.