Coronavirus : भारतातील कोरोनाबाबत वैज्ञानिकांनी केला दावा, म्हणाले – ‘मे नंतर आणखी हाहाकार माजवणार व्हायरस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत भारतात लोक संक्रमित होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांनी भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पिक अवर जून महिन्यात असेल असा दावा केला आहे. हा अनुमान अमिरिका, ब्राझील आणि यूकेसह 12 देशांच्या विश्लेषणावर आधारित आहेत.

भारतामध्ये एप्रिल महिन्यात कोरोनामुळे झालेल्या विक्रमी मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. विविध अभ्यासक आणि संशोधकांचे म्हणणे आहे की, 15 मे च्या जवळपास कोरोनाचा पीक अवर येऊ शकतो आणि त्यानंतर त्याचा वेग कमी होईल. परंतु भारतासाठी हा कठीण काळ आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. एका नव्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या पीकअवरचा कालावधी जूनपर्यंत जाऊ शकतो. हा अभ्यास हॉकाँगच्या एका ब्रोकरेज कंपनी CLSA ने केला आहे.

भारतात 0.5 टक्के लोक संक्रमित

कंपनीच्या अभ्यासानुसार, अमेरिका, ब्राझील, युकेसह 12 देशांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार आहे. या देशात एकूण लोकसंखेच्या दोन टक्के लोक ज्यावेळी कोरोना संक्रमित होतील त्यावेळी तो कोरोनाचा पीकअवर असेल. या अभ्यासात असेही म्हटले आहे की, भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट असून देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 0.5 टक्के लोकच संक्रमित झाले आहे. दोन टक्के लोक संक्रमित होण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

महाराष्ट्रात संक्रमण होण्याचे प्रमाण 1.8 %

देशात महाराष्ट्रात कोरोना संक्रमण अधिक झाले आहे. महाराष्ट्रात कोरोना संक्रमण होण्याचे प्रमाण 1.8 टक्क्यांवर आहे. तसेच एका आठड्याच्या कमी कालावधीत संक्रमीत होण्याचे प्रमाण दोन टक्क्यांवर पोहचेल. अभ्यासात असेही वर्तवण्यात आले आहे की, हा अंदाज निश्चितपणे चिंता वाढवणारा आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि होणारे मृत्यू हे जूनपर्यंत सूरू राहिले तर परिस्थिती आणखीनच गंभीर होईल.

मे च्या मध्यावतीत दररोज 4500 मृत्यू

यापूर्वी अमेरिकेतील मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये महामारी तज्ज्ञ भ्रामर मुखर्जी यांनी भारतातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात ट्विट केले होते. त्यांनी म्हटले होते की, भारतात मे महिन्याच्या मध्यावधी पर्यंत रोजच्या रोज 8 ते 10 लाख नवे रुग्ण समोर येतील. तसेच 23 मेच्या जवळपास रोजच्या रोज 4 हजार 500 लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो. तसेच आयटीच्या तज्ज्ञांनी देखील मे महिन्याच्या मध्यापर्यंत नव्या कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्यावर जाईल असे सांगितले होते.