Video : नवीन वर्षात ISRO चे पहिले मिशन, अ‍ॅमेझोनिया -1 सह 18 उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 2021 मध्ये आपले पहिले मिशन फत्ते केले आहे. आज सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 51 लॉन्च करण्यात आले. PSLV-C51 अ‍ॅमेझोनिया -1 आणि अन्य 18 उपग्रहांसह अवकाशात गेले आहे. इस्रोने निवेदनात म्हटले की, पीएसएलव्ही-सी 51 हे पीएसएलव्हीचे 53 वे मिशन आहे. या रॉकेटमुळे ब्राझीलच्या अ‍ॅमेझोनिया -1 उपग्रहासह अन्य 18 उपग्रहही अवकाशात पाठविण्यात आले आहेत. इस्रोच्या म्हणण्यानुसार हे रॉकेट चेन्नईपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले आहे. हे रॉकेट 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले होते. अ‍ॅमेझोनिया -1 ला यशस्वीरित्या त्याच्या कक्षेत दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

 

पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) सी 51 / अ‍ॅमेझोनिया -1 इस्रोची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) ची प्रथम समर्पित व्यावसायिक मिशन आहे. अ‍ॅमेझोनिया -1 चार वर्षे डेटा पाठवत राहील. हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी ब्राझीलमधील शास्त्रज्ञांची टीम भारतात आली. इस्रोचे अध्यक्ष के शिवन म्हणाले की, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांसाठी ही अभिमानाची बाब आहे. ते म्हणाले की अ‍ॅमेझोनिया -1 संपूर्णपणे ब्राझीलच्या वैज्ञानिकांनी तयार केले आणि विकसित केले.

इस्रोचे विज्ञानमंत्री हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी सतीश धवन अवकाश केंद्रात उपस्थित होते. ते म्हणाले की, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या लॉन्चिंगसाठी भारतापेक्षा उत्तम जागा कोणतीही असू शकत नाही. अ‍ॅमेझोनिया – 1 संदर्भात निवेदनात म्हटले की, उपग्रह अ‍ॅमेझोन प्रदेशातील जंगलतोड रोखण्यासाठी रिमोट सेन्सिंग डेटा उपलब्ध करुन देईल आणि ब्राझीलसाठी विविध शेती विश्लेषित करेल आणि विद्यमान पायाभूत सुविधा आणखी मजबूत करेल.

अ‍ॅमेझोनिया -1 उपग्रह प्रक्षेपित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष जैयर बोलसोनारो यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, इस्रोच्या इतिहासातील हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे, त्याबद्दल मी ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो.