Pune News : ‘कोरोनील’मुळे बाबा रामदेव अडचणीत, जुन्नर न्यायालयात तक्रार दाखल

पोलीसनामा ऑनलाईन – योगगुरु बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे. कोरोनील औषधाविरोधात एका व्यक्तीने जुन्नर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. कोरोनीलमुळे कोरोना बरा होत असल्याचा केलेला दावा हा शुध्द फसवणूक असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या औषधाविरोधातील ही महाराष्ट्रातील पहिली तक्रार आहे.

मदन कुऱ्हे (25 वर्ष) असे तक्रारदाराचे नाव असून तो मराठवाडा मित्र मंडळ विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. न्यायालयाने कुऱ्हे याला आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनीला पाठवलेल्या नोटीस सादर करण्यास सांगितले आहे. कुऱ्हे यांनी बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात फसवणूक, कट रचणे प्राणघातक साथरोग पसरवण्यास कारणीभूत ठरणे आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. बाबा रामदेव यांनी कोरोनीलमुळे कोरोना रुग्ण हा केवळ 3 दिवसात बरा होतो असा विश्वास दाखवला होता. मात्र त्यांचा हा दावा शुध्द फसवणूक असल्याचे कु-हे यांनी म्हटले आहे. दरम्यान कुऱ्हे यांचे वकील असीम सरोदे यांनी या तक्रारीबाबत म्हणाले की, हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून हे आरोग्य अधिकाराचेही उल्लंघन आहे.