भारत डिसेंबर 2021 मध्ये अवकाशात माणूस पाठवणार : ISRO चे प्रमुख के. सिवन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान-२ मोहिमेनंतर इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी भारताच्या भविष्यातील अवकाश तंत्रज्ञानाच्या योजनांबद्दल माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी भारताकडून माणूस अवकाशात पाठविण्याच्या योजनेबद्दलही सांगितले. तसेच चांद्रयान २ च्या कामाविषयी माहिती दिली. आयआयटी भुवनेश्वरच्या पदवीदान समारंभात सिवन बोलत होते.

या आहेत आगामी योजना :
डिसेंबर २०२१ मध्ये आपल्या स्वत:च्या रॉकेटमधून पहिला भारतीय व्यक्ती अवकाशात पाठवण्याचे लक्ष्य असल्याचे सिवन यांनी सांगितले. त्याआधी डिसेंबर २०२० मध्ये मानवी अवकाश विमान स्पेसमध्ये पाठवण्याची योजना असून या मानवी अवकाश विमानाची दुसरी चाचणी जुलै २०२१ मध्ये असेल. केवळ चाचणीसाठी असणारी ही मानवरहित मोहिम असेल आणि त्यासाठी इस्रोमध्ये काम सुरु असल्याचे असे सिवन यांनी स्पष्ट केले.

लँडरशी संपर्क नाहीच :
मागील काही दिवसांपासून लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु होते. मात्र अखेरीस लँडर बरोबर संपर्क प्रस्थापित करता आला नाही. लँडर आणि त्यामध्ये असलेल्या रोव्हरचे आयुष्य १४ दिवसांचे होते. चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे आता हा संपर्क कधीच होऊ शकत नाही.

चांद्रयान २ चे काम व्यवस्थित :
चांद्रयान २ मोहिमेत ९८ टक्के यश मिळाले असून विक्रम लॅन्डर बद्दलचा अपघात सोडल्यास चांद्रयान २ मोहीम यशस्वी झाली आहे. यातील सर्व ऑर्बिटर चांगले काम करत आहे. ऑर्बिटरमध्ये एकूण आठ उपकरणे असून त्यांच्याकडून अपेक्षित असलेले सर्व कार्य व्यवस्थित सुरु आहे. यातील तंत्रज्ञान क्षमतेच्या सादरीकरणात आम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलो आहोत असे सिवन म्हणाले. आता “लँडर बरोबर काय घडलं ते शोधून काढण्याला आमचे पहिले प्राधान्य आहे.”

विध्यार्थ्यांना मार्गदर्शन :
आमचे पुढचे प्राधान्य मिशन गगनयान असल्याचे सिवन यांनी सांगितले. गगनयान मिशन देशासाठी खूप महत्वाचे असून त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना मिळेल. यावेळी त्यांनी विध्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शनही केले. यशस्वी होण्यासाठी धोका पत्करणे देखील गरजेचे असल्याचा कानमंत्र त्यांनी विध्यार्थ्यांना दिला.

Visit :- policenama.com