Mumbai News : चिंताजनक ! उपनगरात घसरतोय मुलींचा जन्मदर, 1000 मुलांमागे ‘एवढ्या’ मुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातून(National Health Survey)मुंबई उपनगरात 1000 मुलांमागे फक्त 703 मुलीचं प्रमाण असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दर 5 वर्षांनी या सर्वेक्षणाचा अहवाल प्रसिद्ध केला जातो.

2015 च्या सरासरीच्या तुलनेत 2019-20 मधील सरासरींचं मुलींचं प्रमाण हे 1000 मुलांमागे 703 वर आलं आहे. 2015 साली हा आकडा 932 एवढा होता. वर्सोवाच्या आमदार डॉ भारती लव्हेकर यांनी एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं की, एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव म्हणत सर्व पातळ्यांवर मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत, असं असतानाच मुलींचा जन्मदर घसरतो आहे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.

भारती लव्हेकर यांनी डॉटर्स ऑफ वर्सोवा हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. मुलीचा जन्मदर वाढावा तिचं जीवनमान सुधारावं यासाठी त्या त्यांच्या ती फाऊंडेशन या एनजीओच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असून जनजागृती करतात.

डॉटर्स ऑफ वर्सोवा या उपक्रमाअंतर्गत वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील नवजात मुलींच्या जन्माचं स्वागत डॉ लव्हेकर स्वत: नवजात बालिकेच्या घरी किंवा रुग्णालयात जाऊन किंवा आपल्या कार्यालयात करतात. नवजात बालिकांच्या घरी भेटवस्तू देऊन लक्ष्मी आली घरा म्हणून स्वागत केलं जातं. स्वत: आमदार आपल्या बालिकेचं स्वागत करतात याचा अतिशय सकारात्मक संदेश लोकापर्यंत जातो. त्यांनी 2015 साली हा उपक्रम सुरू केला होता. आतापर्यंत त्यांनी 14179 नवजात मुलींचं स्वागत केलं आहे.