दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवकुमारवर आणखी 3 गुन्हे दाखल

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाइन – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेले निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर आणखी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. दीपाली चव्हाण यांना शिवीगाळ करणे, धमकी देणे, निलंबित करण्याचा दबाव टाकणे व अपमानीत केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली आहे. विनोद शिवकुमार यांच्यावर नव्याने गुन्हे दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पोलिस तपासात आरोपी शिवकुमार याने दीपाली यांना त्रास दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपाली चव्हाण हीचा गर्भपात झाला होता. तिच्या औषधाचे कागदपत्रे पोलिसांनी प्राप्त झाले आहेत. तसेच साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय कागदपत्रे यांचा पोलिसांनी बारकाईने तपास केला. यात आरोपीने त्रास दिल्यामुळे दीपालीचा गर्भपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. आरोपी हा दीपाली यांना शिवीगाळ करण्यासोबत निलंबित करण्याची धकमी देत होता. त्याने तिला भयभीत करताना अपमानीत केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील करीत आहेत. तपासातील निष्कर्षावरील शिवकुमार यांच्यावर नव्याने 3 गुन्हे दाखल केले आहेत.