दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास IPS अधिकारी प्रज्ञा सरवदे करणार

अमरावतीः पोलीसनामा ऑनलाईन – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या महिला डीवायएसपी अधिकारी पूनम पाटील करत आहेत. पण या प्रकरणाची चौकशी आयपीएस अधिका-यांकडून व्हावी, अशी मागणी भाजप आणि वन कर्मचारी तसेच अधिकारी संघटनेने केली होती. त्यानंतर राज्य शासनाने हा तपास आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांच्याकडे दिला आहे.

याबाबत अमरावतीच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या प्रवक्त्याने सांगितले की, दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास डीवायएसपी पूनम पाटील करत आहेत. सोबतच एक आयएफएस अधिकारी असल्याने याचा वेगळा तपास करण्यासाठी शासनाने आयपीएस प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली आहे दोन्ही तपास आपापल्या पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.