स्मार्ट सिटी लिमिटेडचे संचालक, अधिकारी स्पेनच्या अभ्यास दौर्‍यावर

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे संचालक व अधिकारी स्पेन देशातील बार्सिलोना शहराच्या अभ्यासदौर्‍यास सोमवारी (दि.१२) रात्री उशिरा रवाना झाले आहेत. हा दौरा शनिवारपर्यंत (दि.१७) असून, त्यासाठी २० लाख २२ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. या दौर्‍यात सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील पदाधिकारीही सहभागी आहेत. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप मात्र स्वखर्चाने सहभागी झाले आहेत.

बार्सिलोना शहरात स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेसच्या वतीने स्मार्ट सिटी एक्प्रो काँग्रेस २०१८ या परिषदेचे १३ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. या परिषदेत आणि अभ्यासदौर्‍यात महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे, महापालिका आयुक्त व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता राजन पाटील हे सहभागी आहेत.

अवनीचे बछडे सापडले… पण त्यांचा झाला संशयास्पद मृत्यू 

आयुक्त हर्डीकर पूर्वीच रवाना झाले असून, सत्तारूढ पक्षनेते पवार, विरोधी पक्षनेते साने, चिखले, कुटे, पोमण व पाटील हे सोमवारी रात्री रवाना झाले आहेत. तसेच, भाजपचे शहराध्यक्ष आमदार जगताप हे स्वखर्चाने दौर्‍यात सहभागी झाले आहेत. या दौर्‍यासाठी २० लाख २१ हजार २५० रुपये खर्च येणार आहे. त्या खर्चास स्थायी समितीने २९ ऑक्टोबरला मंजुरी दिली आहे.

या स्मार्ट सिटी परिषदेत जगातील शहरांच्या विकासासाठी भविष्यकालीन दृष्टिकोन, ध्येय ठरवून जगातील शहरे विकास करणे व शहरे राहण्यायोग्य बनवणे. त्यासाठी तज्ज्ञांचे चर्चासत्र, परिसंवादाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

शहरे सशक्त बनविण्यासाठी शासन, संस्था, व्यावसायिक, संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून शहरी समस्या व उपाययोजना यांच्यावर एकत्रित चर्चा करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीची अंमलबजावणी केली जाणार आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.