अमेरिकेचं स्वप्न पाहणार्‍या भारतीयांची ट्रम्प यांनी वाढवली चिंता, घेतला ‘हा’ महत्वपुर्ण निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना संकटकाळात स्वदेशी लोकांचे उर्वरित रोजगार वाचवण्यासाठी स्थलांतरबंदी लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी यापूर्वीच घेतला होता. मात्र आता त्यानंतर स्लथांतरबंदीचा कार्यकाळ आणखी 3 महिने वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय ट्रम्प यांनी गुरुवारी (दि. 31) नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच घेतला आहे. ट्रम्पच्या या निर्णयामुळे अनेक “ग्रीन कार्ड” अर्जदार आणि तात्पुरते अमेरिकेत येणाऱ्या परदेशी कामगारांना देशात प्रवेश करण्यासाठी अडथळा होणार आहे.

एप्रिल आणि जून महिन्यात स्थलांतरबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. 31 डिसेंबरला ही बंदी संपुष्टात येणार होती. पण आता ही बंदी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रम्प सरकारच्या परदेशी कामगारांवर बंदीच्या निर्णयाचा अनेक उद्योजकांनी जाहीरपणे विरोध केला होता. लवकरच राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणारे जो बायडन यांनी या बंदीच्या निर्णयाचा विरोध केला होता. पण सत्तेत आल्यानंतर निर्णय बदलण्याबद्दल त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिले आहे.

साठ दिवस नवीन ग्रीनकार्ड देण्यावर बंदी
कोरोनाचा फटका बसला असताना अमेरिकेत सध्या 2 कोटी लोकांना बेरोजगारी भत्ता मिळत आहे. अमेरिकेत दरवर्षी मोठया प्रमाणावर परदेशी नागरिक नोकरीसाठी येतात. त्यांना एच 1 बी आणि अन्य वर्क व्हिसा दिले जातात. तेच व्हिसा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. सतत नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेण्याची अमेरिकेची कल्पकता आणि स्पर्धात्मक वातावरण याला दुहेरी फटका बसेल असा इशारा या आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांनी दिला होता. पण आता याचा कार्यकाळ अजून तीन महिने वाढवण्यात आला आहे.