Flipkart, Amazon मध्ये बंपर भरती ! E-Commerce कंपन्या फेस्टीव्हल सीजनमध्ये देणार 3 लाख नोकऱ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या फेस्टीव्हल सीजनमध्ये आपली विक्री वाढवण्यासाठी ई कॉमर्स कंपन्या बंपर नोकर भरती करणार आहेत. फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनसारख्या अनेक ई कॉमर्स कंपन्या देशातील जवळपास 3 लाख लोकांना नोकऱ्या देणार आहेत. RedSeer च्या अहवालानुसार, फेस्टीव्ह सीजन पाहता ई कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे बहुतेक नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात केल्या जातील. इतकंच नाही तर ई कॉमर्स कंपन्यांकडून वस्तू वितरीत करणाऱ्या लॉजिस्टीक कंपनी ई एक्सप्रेसनेही 30 हजार नवीन नोकऱ्यांची घोषणा केली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कंपन्यांमध्ये नोकर भरती अपेक्षित आहे.

20 टक्के कामगारांची कपात नाही

RedSeer च्या म्हणण्यानुसार, फेस्टीव्ह सीजन संपल्यानंतर तात्पुरत्या कामगारांपैकी 20 टक्के कामगारांची कपात केली जाणार नाही. अलीकडच्या काळात लोकांमध्ये ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन भारतात 1 लाख लोकांची भरती करणार आहे. नवीन कर्मचारी ऑर्डर पॅकिंग, शिपिंग किंवा क्रमवारी लावण्यात मदत करतील. कामगारांची नियुक्ती ही अर्धवेळ आणि पूर्णवेळ तत्वावर केली जाईल.

याचबरोबर अहवालात म्हटलं आहे की, अंदाजे 3 लाख नोकऱ्यांपैकी 70 टक्के या ऑनलाईन प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे देण्यात येतील अशी अपेक्षा आहे. तर उर्वरीत ईकॉम एक्सप्रेस इत्यादी लॉजिस्टीक कंपन्या देतील. या नोकऱ्यांपैकी 60 टक्के लॉजिस्टीक्स कार्यात असल्याचा अंदाज आहे. उर्वरीतपैकी 20 टक्के वेअर हाऊसिंग म्हणजेच गोदामात आणि 20 टक्के ग्राहक सेवा कार्यात असू शकतात.

फ्लिपकार्टमध्ये अशी असणार भरती

महिन्याच्या सुरुवातीला फ्लिपकार्टनं म्हटलं होतं की, या फेस्टीव्हल सीजनमध्ये 70,000 लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नोकरी मिळण्यास मदत होईल. फ्लिपकार्टमध्ये थेट नोकऱ्या पुरवठा साखळी विभागात देण्यात येतील. त्याअंतर्गत कंपनी डिलीव्हरी एक्झिक्युटीव्ह, पिकर्स, पॅकर्स आणि शॉर्ट्सची भरती करणार आहे. याशिवाय कंपनी फ्लिपकार्टच्या सेलर पार्टनर लोकेशन आणि किराणा दुकानांमध्ये अप्रत्यक्षरित्या लोकांना नोकरी देईल.