ED कडून साखरसम्राट रत्नाकर गुट्टेंची 255 कोटींची मालमत्ता जप्त

पोलिसनामा ऑनलाइन – सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली अशी माहिती ईडीने दिली. रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड मालकीची आहे. तसेच कंपनीचे संचालकही आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पीक खरेदी करताना रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांची माहिती घेत एक डेटा बँक तयार केला. यानंतर गंगाखेड साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने काही बँकांशी जोडला गेला. थोडक्यात बँकांसाठी ते एजंट झाले आणि शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. दरम्यान, तपासात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतलं. बँकांनी २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यान जवळपास ७७२ कोटींचं कर्ज मंजूर केलं आणि ६३२ कोटींची वाटप केलं. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. दुसरीकडे गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून मिळालेल्या स्वाक्षरीचा फायदा घेत हे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकले. कंपनीने हा पैसे जमीन तसंच शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी वापरले.

रत्नाकर गुट्टे इतरांच्या मदतीने गरीब शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी कर्ज योजनेचा गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. या कर्ज योजनेअंतर्गत बँका ऊस शेतकऱ्यांना (जमिनीच्या आधारे) पीकांसाठी महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ बियाणं, खतं, ट्रॅक्टर, पंप आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसा देतं. या बँक घोटाळ्यावरुन ईडीने कारवाई केली असून २५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये गंगाखेड साखर कारखान्यातील २४७ कोटींचा शुगर प्लांट आणि मशीनरी आहे. तीन कंपन्यांची पाच कोटींची जमीन आहे. १.५८ कोटींचा बँक बॅलेन्स तसंच १.९१ कोटींचे शेअर्स आहेत.