Eknath Shinde On Ajit Pawar | ते डोक्यावर बर्फ ठेवतात कारण त्यांना अनेक अनुभव…, अजितदादांही खळखळून हसले (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Eknath Shinde On Ajit Pawar | रोज सात वाजता मी घराबाहेर पडताना तोंडात साखर ठेवून आणि डोक्यावर बर्फ ठेवून घराबाहेर पडतो असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आयोजित केलेल्या महायुतीचा पहिल्या मेळाव्यात केले. हाच धागा पकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजितदादा बोलताना म्हणाले डोक्यावर बर्फ ठेवा ते ठेवतात कारण त्यांना असे अनेक अनुभव आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर अजित पवार देखील खळखळून हसले. (Mahayuti Melava Pune)

एकनाथ शिंदे म्हणाले, जेवढी लोकं आत तेवढीच लोकं बाहेर. चारही उमेदवार भरगोस मतांनी विजयी होणार अशी परिस्थिती आहे. कार्यकर्ता जेव्हा निवडणूक आपल्या हातात घेतो तेव्हा उमेदवारांचा विजय हा निश्चितपणे होतो. शिवसेना भाजपची युती 25 -30 वर्षे जुनी बाळासाहेब असतील, वाजपेयी साहेब असतील, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असतील, यांच्यापासून युती अभेद्य त्यात अजितदादा सहभागी झाले आहेत. (Pune Lok Sabha Election 2024)

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याआधी पुण्यात एक धागा श्रीरामासाठी अशी मोहीम सुरू होती, पुणेकरांनी विणलेली वस्त्र प्रभू रामचंद्रासाठी पाठवण्यात आली. आताही मतांची अशीच वस्त्रे विणून दिल्लीकडे आपल्याला पाठवायचे आहेत त्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत. इथे आता भाऊ, तात्या कुणी नाही मुरलीअण्णाच निवडून येणार. त्याने बुथवरील कार्यकर्ता ते खासदारकीचा उमेदवार अशी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या कामाची स्तुती केली.

मोदी साहेब म्हणतात आपल्याला बूथ जिंकणे गरजेचे आहे अजितदादा म्हणाले प्रत्येक बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांने लोकांना बाहेर काढणे गरजेचे आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्रावर आणायचे आहेत हाच मतदार मोदी साहेबाना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

धंगेकर, वसंत मोरेंवर निशाणा

मुरलीअण्णा पैलवान होते, सहा वर्षे कोल्हापूरात तालमीत शिकायला होते, महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यशस्वी नियोजन करण्यात त्यांचा सहभाग होता, पैलवान लोकांना कधी कोणता डाव टाकायचा ते बरोबर माहीत असतं. त्यामुळे राजकीय आखाडा देखील ते नक्की जिंकतील त्यांच्यासोमोर स्वार्थासाठी अनेक पक्ष बदलणारे टिकणार नाहीत. असं मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे या दोन्ही उमेदवारांवर नाव न घेता टीका केली.

उच्चशिक्षित उमेदवार निवडून जायला हवा

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे एक उच्चशिक्षित उमेदवार येथून निवडून जायला हवा यासाठी सर्वांनी पूर्ण क्षमतेने काम करावे. मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मनपामध्येही काम केले. स्थायी समिती सभापती म्हणूनही काम केले. महापौर म्हणून काम केले असा प्रदीर्घ राजकीय अनुभव आपल्याकडे आहे. जेव्हा त्यांच्या कार्यक्रमाला यायचो तेव्हा खात्री वाटायची की योग्य दिशेने काम करणारा हा कार्यकर्ता एक दिवस मोठ्या पदावर नक्की जाईल. एखादा कार्यकर्ता कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडे सगळी पदे आपोआप चालून येतात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

अजितदादांना अनेक चांगले वाईट अनुभव

राज्यातून 45 हुन अधिक खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत त्यात पुण्यातील चारही खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहेत. कमळ बटन दाबून मोदींना मत दिले जाते मात्र त्यासोबतच धनुष्यबाण आणि घड्याळ बटन दाबून देखील मोदींना मत जाते हे आपल्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या लक्षात आणून द्यायचे आहे. अजितदादांना अनेक चांगले वाईट अनुभव आलेले आहेत त्यामुळे ते ठेवतात तसा डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर तुम्हीही ठेवत जा असा सल्लाही एकनाथ शिंदेंनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवा

आपला जो मतदार असतो तो आपल्याला बोलून दखवतो याने असे केले नाही तसे केले नाही त्याचे म्हणणे नीट ऐकून घ्या. कारण जो बोलतो तो आपलाच मतदार असतो त्याला दोनदा तीनदा भेटल्यावर आपल्याला तो नक्की मतदान करेल. मोदींनी गेल्या 10 वर्षात केलेले काम आणि जे काम 60 वर्षात झाले नाही ते त्यांनी केले. ते काम आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहे.

करोना काळात पुण्यात भ्रष्टाचार

कोरोना काळात आपण सगळे काम करत होतो मोदी देखील काम करत होते. आपल्याला जे हवे ते देतच होते पण जगभरातील छोट्या देशांची भारताकडून असलेली मदतीची अपेक्षा देखील पूर्ण करत होते. पुण्यात देखील कोरोना काळात मोठा भ्रष्टाचार झाला. आपण लोकं लोकांना मदत करण्याचे काम करत होतो तर काही लोकं त्याचवेळी भ्रष्टाचार करून खिसे भरत होते. खिचडी मध्ये भ्रष्टाचार, ऑक्सिजन प्लँट मध्ये भ्रष्टाचार, बॉडी बॅग मध्ये भ्रष्टाचार करत होते, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

परदेशी गुंतवणूकित महाराष्ट्र क्रमांक एकवर

राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यात मेट्रोचा विस्तार, रस्ते करतोय,पूल करतोय भिडे वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचे भव्य स्मारक करतोय. लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक करतोय. राज्य सरकारने 120 सिंचन प्रकल्पाना सुप्रमा दिल्या 20 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आणली. शेतकऱ्यांना केंद्राचे 6 राज्याचे 6 असे 12 हजार दिले. एक रुपयात पीक विमा दिला. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या माध्यमातून 5 कोटी लोकांना विविध शासकीय योजनांचे थेट लाभ मिळवून दिले. परदेशी गुंतवणूकित महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. डाओसला जाऊन 3 लाख 73 हजार कोटींचे सामंजस्य करार आपण केले आहेत. भरतीवर असलेली बंदी आपण काढल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

अहंकाराची लंका मतदारच जाळतील

मतदारांना भेटताना खाली मान घालायची गरज नाही गेल्या दीड वर्षात एवढे निर्णय घेतलेत एवढी कामे केलीत की ज्याची पुस्तिका जरी लोकांच्या हातात ठेवली तरीही लोकं तुम्हाला प्रश्न विचारणार नाहीत. गेल्या अडीच वर्षात राज्यात चालू असलेली कामे वैयक्तिक इगोपायी बंद करण्यात आली. मी होतो अजित दादाही होते. राज्यकर्त्याने कधीही वैयक्तिक इगो बाळगायचा नसतो, आता ही अहंकाराची लंका मतदारच जाळून खाक करणार असल्याचे शिंदेंनी म्हटले.

मोदी है तो मुमकिन है

दररोज नवनवीन आरोप होतायत मात्र आम्ही आरोपांना फक्त कामाने प्रत्युत्तर देत आहोत. 2014 पूर्वी देशात घोटाळे, बॉम्बस्फोट, दंगली अराजकता एवढंच चित्र सगळीकडे होते मात्र आता हे चित्र बदलले आहे. मोदींनी देशाला विकासाकडे नेले आहे. म्हणून सगळे म्हणातत मोदी है तो मुमकिन है. 370 कलम हटवणे असेल राम मंदिर उभारणे ही कामे स्वप्नवत अशीच होती ती मोदींनी पूर्ण करून दाखवली. मोदींचे हात बळकट करण्यासाठी चारही उमेदवारांना पुन्हा विजयी होण्यासाठी शुभेच्छा देतो, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Shinde On Pune Lok Sabha | पुण्यात भाऊ, तात्या कुणी नाही, मुरली अण्णाच रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Video)