‘सीरम’च्या टॉपच्या डायरेक्टरचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘ना स्टॉक पाहिला-ना WHO ची गाइडलाईन्स, सरकारनं केला लसीकरणाचा विस्तार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जास्त आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार, लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. पण याच लसीकरणावरून ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी भाष्य केले.

देशात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्यावर बोलताना सुरेश जाधव म्हणाले, ‘सरकारने लसीकरण अभियानाच्या विस्तारासाठी लसींची उपलब्ध स्टॉक आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाईडलाईन्सकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता देशातील अनेक राज्यांत लसींचा तुटवडा जाणवत आहे. WHO ची गाईडलाईन लक्षात घेऊन लसीकरण करणे गरजेचे होते. पण असे झाले नाही. सुरुवातीला 300 मिलियन लोकांना लस दिली जाणार होती. त्यासाठी 600 मिलियन डोसची गरज होती’.

लसींचा साठा नसल्याचे सरकारलाही होते माहीत

आपण आपल्या उद्दिष्ट्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच सरकारने 45 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासोबतच 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. पण हे करत असताना सरकारला माहीत होते की आपल्याकडे लसींचा पुरेसा साठा नाही. तरीही लसीकरण करण्यात आले. त्यामुळे आता आपल्याला किती साठा आहे, त्यानुसार लक्ष देणे गरजेचे आहे.

लोकांना सतर्क करण्याची गरज

लसीकरण करणे गरजेचे आहेच पण लस घेतल्यानंतरही लोक बाधित होत आहेत. त्यामुळे लोकांना सतर्क करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. कोरोना गाईडलाईन्सचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच कोणती लस प्रभावी आहे हे सांगणे आता योग्य नसेल. जी कोणती लस उपलब्ध आहे ती घेणे गरजेचे असल्याचेही सुरेश जाधव यांनी सांगितले.